
>> दुर्गेश आखाडे
‘धरण गावच्या नदीवर आणि गावकरी पाणी भरताहेत डबक्यावर’ अशी अवस्था रत्नागिरी तालुक्यातील शीळवासीयांची झाली आहे. शीळ नदीवर बांधलेले धरण आज रत्नागिरी शहराची तहान भागवतेय; पण शीळ गावातील ग्रामस्थांना पडक्या जॅकवेलमधील पाण्यावर तहान भागवावी लागतेय. त्या डबक्यातील पाणीही आटत चाललं आहे. पाऊस लांबला तर शीळ गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावणार आहे.
शीळ नदीवर धरण बांधून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा सुरू झाला तेव्हा शीळवासीयांनाही जॅकवेलमधून पाणीपुरवठा करण्यात येत होता. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी शीळ धरणातील जुनी जॅकवेल कोसळली. तेव्हा रत्नागिरी शहराबरोबरच शीळ गावचा पाणी प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी बाजूला असलेल्या फ्लोटिंग जेटीवरून नदीतील पाणी पंपाद्वारे खेचून शहरात पाणीपुरवठा करण्यात आला. नवीन नळपाणी योजनेत नवीन पाणी साठवण टाकी बांधण्यात आली. रत्नागिरी शहराला या टाकीतून पाणीपुरवठा होऊ लागला, मात्र शीळ गावाला त्या नवीन टाकीतून पाणीपुरवठा करण्यास रत्नागिरी नगर परिषदेने विरोध केला. अखेर पंप नदीत टाकून शीळ गावाला पाणीपुरवठा सुरू होता. उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी आटले. त्यामुळे पडलेल्या जॅकवेलच्या खड्डय़ात पंप टाकून सध्या शीळ गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. या खड्डय़ातील पाणीसाठाही कमी होत आला आहे त्यामुळे पाऊस लांबल्यास शीळ गावावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवेल. ज्या नदीवर बांधलेले धरण रत्नागिरी शहराची तहान भागवत आहे त्या गावावर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.
शीळ धरण परिसरात प्रचंड अस्वच्छता
ज्या धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो त्या धरण परिसरात झाडझुडपांचे साम्राज्य निर्माण होऊन प्रचंड अस्वच्छता पहायला मिळते. परिसर मद्यपींचे अड्डे बनले असून दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या पहायला मिळतात.
नवीन साठवण टाकी मजबूत आहे का?
नवीन पाणी साठवण टाकीच्या भोवती उन्हाळ्यातही झाडेझुडपे वाढली आहेत. आजूबाजूला पाणी दिसते. त्यामुळे नवीन पाणी साठवण टाकी मजबूत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नवीन पाणी साठवण टाकी सुरू होऊनही फ्लोटिंग जेटीवरून पंपाने पाणी खेचले का जातेय, असे प्रश्नही परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत.

























































