
सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री करत हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. फेसबुकवर ओळख करून व्हॉटस ॲप वर व्हिडीओ कॉल करून अश्लील चित्रिकरण करत पुढे ते सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत पैसे मागण्याचे प्रकार घडत आहेत.
रत्नागिरीतील एका तरुणाला दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमावर एका सुंदर मुलीने हॅलो, हाय असा संदेश पाठवला. मुलगी सुंदर दिसल्याने मुलगाही तिच्या जाळय़ात अलगद अडकला. त्यानेही तिला उत्तर दिले. मुलाकडून प्रतिसाद मिळाल्याचे बघून मुलीने थेट त्याचे भ्रमणध्वनीवर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधला. दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर काही वेळातच मुलाच्या ‘व्हॉट्सअॅप’ मध्ये एका सुंदर मुलीसोबतचे अश्लील चित्रण पाठवण्यात आले. त्यामध्ये सुंदर मुलीसोबत या मुलाचेही संगणकावर तयार केलेले अर्धनग्न व्हिडीओ होते. सोबत बँक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुम्हाला समाज माध्यमावर बदनाम करू अशी धमकी देखील या तरुणाला दिली गेल्याचे बोलले जात आहे. सदर अश्लील छायाचित्रण बघून तो तरुण घाबरला, गोंधळला, मात्र स्वत:ला सावरत त्याने घडलेला प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. मित्रांनी त्याला धीर देत पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे.
समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करा
याचसोबत रत्नागिरीत अशा पद्धतीने अनेकांना ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून ‘ब्लॅकमेलिंग’ केल्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा, स्वत:चे फेसबुक प्रोफाईल लॉक करून ठेवावी, अनोळखी व्यक्तींना मॅसेंजरवर संवाद साधू नका, असे आवाहन पोलिसांच्या वतीने वारंवार करण्यात येतंय.




























































