प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत रत्नागिरी जिल्हा अव्वल स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 107 टक्के उद्दिष्टपूर्ती तसेच राज्यस्तरीय कार्यमूल्यांकन क्रमवारीत मे 2022 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याने अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे. केंद्र शासनाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात 1 जानेवारी 2017 पासून कार्यान्वित झाली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे.

ही योजना केंद्र पुरस्कृत असून या योजनेमध्ये शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे. योजनेचे उद्दिष्ट असे आहे. माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या राष्टीने गर्भवती महिला स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट येऊन तो नियंत्रणात रहावा. प्रसुतीपूर्व प्रसुतीपश्चात महिलेला आपली बुडीत मजुरी मिळावी यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना कार्यान्वित केली आहे.

शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस तिच्या पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत एकदाच लाभ अनुज्ञेय असून, लाभाची रक्कम 5 हजार रुपये इतकी आहे. चैतन्यासह मातृत्व रजा मिळवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, मात्र लाभार्थी गर्भवती महिलेस खाली दर्शविल्याप्रमाणे 5 हजार रुपये बँक सलग्न खात्यात किंवा पोस्ट खात्याद्वारे समाजातील सर्व स्तरांतील मातांना तीन टप्प्यांत जमा केली जाते. पहिला हप्ता रक्कम 1 हजार रुपये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांत शासकीय संस्थेत नोंदणी केल्यानंतर, दुसरा हप्ता रक्कम 2 हजार रुपये किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने तसेच 180 दिवस पूर्ण होणे आवश्यक, तिसरा हप्ता रक्कम 2 हजार रुपये प्रसुतीनंतर बाळाचे 14 आठवडयापर्यंतचे सर्व लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात. यासाठी लाभार्थी आणि तिच्या पतीचे आधार कार्ड, आधार सल्बन बँक किंवा पोस्ट खाते, माता व बाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र, बाळाचे लसीकरण कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

ही योजना उत्तमरित्या राबवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच आरोग्य संस्थांच्या परिसरामध्ये पोस्टर्स, बॅनर्स, वर्तमानपत्रे व रेडियो प्रक्षेपणाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा यांचा सहभाग घेण्यात येतो. सद्यस्थितीच रत्नागिरी जिल्हयामध्ये राज्यस्तरावरून देण्यात आलेले मातांचे 29 हजार 606 उद्दिष्टांपेक्षा एकूण 31 हजार 857 मातांना एकूण रु. 13,51,98,000/- लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जिल्हयात कोविड साथीच्या लॉकडाऊन काळातही आणि नागरिकांचा तसेच पात्र मातांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली.