आटाऽऽऽन रे आटाऽऽऽन, नी कोरोनाला मारा बुटानं! रत्नागिरीत नियम पाळून होणार कोरोनाची होळी

अाटाऽऽऽन रे आटाऽऽऽन …नी कोरोनाला मारा बुटानं रे…होरयो! गणपती, दिवाळी पाठोपाठ यंदा कोरोनाची ‘होळी’ होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे रत्नागिरीत यंदा शिमगोत्सव साधेपणाने आणि सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे होणार आहे.

रत्नागिरीतील श्रीदेव भैरीबुवा देवस्थानने पालखी खेळवणार नसल्याचे जाहीर केले असून 50 लोकांच्या उपस्थितीत शिमगोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालखीची प्रदक्षिणा वाहनातून करण्यात येणार असून गर्दी टाळण्यासाठी शिमगोत्सव आणि पालखीदर्शन भाविकांसाठी ऑनलाईन करण्यात येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज शिमगोत्सवासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.त्यानंतर पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिमगोत्सवाच्या संदर्भात माहिती दिली.ते म्हणाले की, शिमगोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला रत्नागिरीतील देवस्थाननी पहिला सकारत्मक प्रतिसाद दिला आहे.

शिमगोत्सवाची परंपरा आहे त्या परंपराचे पालन करत शिमगोत्सव साधेपणाने साजरा होणार असून देवस्थानांनीच 50 लोकांची मर्यादा निश्चित केली आहे.देवस्थानांनी एक नियमावली तयार केली असून यंदाच्या शिमगोत्सवात त्यानियमावलीचे आपण सर्वांनी पालन करून हा कोरोना लवकर नष्ट होऊ दे आणि पुढल्या वर्षीचा शिमगा दरवर्षीपेक्षा अधिक उत्साहाने साजरा करू अशी प्रार्थना ग्रामदेवतेला करूया असे आवाहन सामंत यांनी केले.

यंदा पालखी नाचवणार नाही!

रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र उर्फ़ मुन्ना सुर्वे यांनी देवस्थानने शिमगोत्सवाची नियमावली तयार केल्याचे सांगितले. 50 लोकांच्या उपस्थितीत शिमगोत्सव साजरा केला जाणार आहे. शहरातून पालखीची प्रदक्षिणा ही वाहनातून केली जाणार आहे. जेणेकरून गर्दी टाळली जाणार आहे.

यंदा होळीचा आकारही कमी करण्यात आला असून होळी उभारताना त्याठिकाणी गर्दी केली जाणार नाही. भैरीबुवाचा शिमगोत्सव युट्युब,फेसबुकवर ऑनलाईन पहाता येणार असून गर्दी टाळत भाविकांना पालखीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. यंदा पालखी नाचवणार नसल्याचे मुन्ना सुर्वे यांनी सांगितले.

सडामिऱ्या येथील पालखीच्या नियमावलीबाबत 14 मार्च रोजीच्या बैठकीत निर्णय होणार असून त्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाईल असे दिनेश सावंत यांनी सांगितले. यावेळी ॲड.भाऊ शेट्ये, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या