अच्छे दिन कुठे आहेत? बुरे दिनच! रत्नागिरीतील ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रमात नागरिकांचा तीव्र संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधानांनी खात्यात 15 लाख रुपये भरतो सांगितले होते, ते आले का?… ‘नाही’. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारणार होते. ते झाले का?… ‘नाही’. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार होते, ते झाले का?… ‘नाही’. देशात बेरोजगारी वाढली आहे. त्याला कोण कारणीभूत आहे? – ‘केंद्रसरकार’. घरगुती गॅस सिलेंडरचा दर 2014 साली किती होता?… ‘चारशे ते साडेचारशे रुपये’. घरगुती सिलेंडरचा दर आज किती आहे ? … ‘1100 रुपयांच्या वर’. पेट्रोलचा दर 2014 साली किती होता?… ’63 रुपये’. सध्या पेट्रोलचा दर किती आहे?… ‘107 रुपये’. मग आता अच्छे दिन आले की बुरे दिन आले?… ‘बुरे दिन’. अशाप्रकारे होऊ दे चर्चा कार्यक्रमात नागरीकांशी संवाद साधत केंद्रसरकारच्या फसव्या आश्वासनांची पोलखोल करण्यात आली.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरात होऊ दे चर्चा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावरुन फिरत केंद्रसरकारच्या फसव्या आश्वासनांची पोलखोल केली. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी नागरीकांशी संवाद साधत त्यांना काही प्रश्न विचारले. केंद्रसरकारच्या योजनांची परिस्थिती जाणून घेतली. या सर्वांना नागरीकांनी नकारात्मक उत्तरे देताना अच्छे दिन ऐवजी बुरे दिनच भोगत असल्याचे सांगितले.

होऊ दे चर्चा कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधताना केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील मिंधे सरकारच्या विरोधात नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला उपजिल्हा संघटक संध्या कोसुंबकर, महिला शहर संघटक मनिषा बामणे, राजश्री शिवलकर, साजीद पावसकर आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.