वर्षानुवर्षे भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली, भाजपला मोठा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली वर्षानुवर्षे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेली रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे ग्रामपंचायत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने खेचून आणली आहे. मावळंगे ग्रामपंचायतीच्या निकालानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मावळंगे हे गाव भाजपचा बालेकिल्ला समजले जात होते. गेली अनेक वर्षे मावळंगे ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता होती. या पुर्वीही भाजपने युतीच्या काळात शिवसेनेला सरपंच पदापासून दूर ठेवले होते. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख किरण तोडणकर यांनी मावळंगे ग्रामपंचायत स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. शिवसेना मैदानात उतरताच भाजपला मोठे आव्हान उभे राहिले.

शिवसेनेने प्रयत्नांची पराकाष्ठा करताना मावळंगे ग्रामपंचायत खेचून आणली. सरपंच पदाच्या निवडणूकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत उमेदवार नम्रता बिर्जे यांना 575 मते मिळाली तर भाजपच्या शिला कदम यांना 390 मते मिळाली. नम्रता बिर्जे यांनी 185 मतांनी विजय मिळवला. या विजयाचे श्रेय विभागप्रमुख किरण तोडणकर यांनी पावस विभागातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच ग्रामस्थांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले आहेत.