
रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी नागाव, टोप, शिये आणि चोकाकपर्यंत रस्त्यासाठी भूसंपादनात शासकीय अधिकाऱयांपेक्षा एजंटच्या टोळ्या टक्केवारीतून संबंधित शेतकऱयांची लूट करत आहेत. त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जमीन भूसंपादनासाठी ठरलेल्या शासकीय दराप्रमाणे शेतकऱयांना पैसे देण्यात येत आहेत. मात्र, अजूनही टोप, शिये, निगवे आदी गावांतील चाळीसहून अधिक शेतकऱयांच्या दहा ते बारा एकर जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अजूनही निधी आलेला नसल्याचे सांगत आहेत. तर, दुसरीकडे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारे एजंट मात्र भूसंपादनाचे पैसे मिळवून देण्यासाठी शेतकऱयांकडे टक्केवारी मागत आहेत. त्यामुळे शेतकऱयांना लुटण्यासाठीच असलेल्या या साखळीतील भ्रष्ट अधिकारी आणि त्या एजंटांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, विशाल देवकुळे, शशी बिडकर, राजू सांगावकर, कमलाकर जगदाळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.






























































