रत्नागिरीत राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था, प्रवाशांचा जीव टांगणीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातून रखडलेल्या  मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे.  मात्र पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर येणारे पाणी आणि चिखल याचे कोणतेच नियोजन केले नसल्याने पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल माती आणि पाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महामार्ग चौपदरीकरणाचा मुळ ठेकेदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई – गोवा महामार्ग आरवली ते वाकेड दरम्यान 91 किलोमीटर मधील चौपदरीकरणाचे काम करत असताना काही ठिकाणी पाईप कल्वर्ट, छोटे पुल , मोठे पुल आणि डोंगराची माती यांमध्ये कामाचे नियोजन ढिसाळ असल्याचे दिसून येत. आहे पाईप कल्वर्ट आणि पुलांचे कामासाठी केलेल्या खोदकामामुळे पावसाळ्यात प्रवाशांच्या प्रवासाला धोका निर्माण झाला आहे. तर डोंगराचा भाग खोदून केलेल्या कामाची माती रस्त्यावर आल्याने महामार्ग निसरडा होण्याची भीती निर्माण झाली असून यामुळे अपघात घडण्याची स्थिती निर्माण होत आहे.

याप्रकरणी अद्याप नियोजन दिसून येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कामाची पावसामुळे झालेली दुरावस्था पाहता आणि संभाव्य अपघात लक्षात घेवून ही बाब आपण उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे याचिकाकर्ते संतोष येडगे यांनी सांगितले आहे.