
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे देशमुख कुटुंबावर अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा दुःखांचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने हादरलेल्या या कुटुंबावर यंदा कुटुंबप्रमुखांच्या अपघाती मृत्यूचा आघात झाला आहे.
गेल्या वर्षी २२ फेब्रुवारीला गजेंद्र देशमुख यांची १३ वर्षीय कन्या मृण्मयी ही इयत्ता आठवीत शिक्षण घेत असताना, तिला त्या दिवशी सकाळी शाळेत जाण्यास उशीर झाला. आईने शाळेत जाण्यास वेळेवर उठवले नाही याचा मनामध्ये राग घेऊन तिने आई घरात काम करत असतानाच घराचा दरवाजा बंद करून पडवीतील वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती . या घटनेने संगमेश्वर कसबा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त झाली होती. देशमुख कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता.
मुलीच्या निधनानंतर गजेंद्र देशमुख यांनी मोठ्या मानसिक संघर्षातून संसार सावरत पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. मात्र या घटनेला वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच नियतीने पुन्हा एकदा या कुटुंबावर घाला घातला. खरेदी करण्यासाठी गजेंद्र देशमुख कोल्हापूर येथे गेले होते. खरेदी आटोपून दुचाकीवरून संगमेश्वरकडे परतताना शाहूवाडी तालुकातील वालूर परिसरात त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात गजेंद्र देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. पन्नाशीही न ओलांडलेल्या या कुटुंबप्रमुखांचा अचानक अंत झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अचानक निधनाने संगमेश्वर कसबा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.































































