
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील खड्पोली एमआयडीसी जोडणारा पूल शनिवारी रात्री कोसळल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पिंपळी येथील हा पूल 1965 साली बांधण्यात आला होता. त्यामुळे तो जीर्ण झाला होता. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. रविवार ते मंगळवार या तीन दिवसात चिपळूणमध्ये प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे वाशिष्ठी नदी तुडुंब भरून वाहत होती. जीर्ण झालेल्या पुलाला पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचे हादरे बसत होते. त्यामुळे पूल हलत होता आणि पुलाच्या मधोमध गेलेला तडा अधिक मोठा होत गेला आणि पूल दुभंगला.
दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प
पोलिसांनी संपूर्ण वाहतूक पेढांबे मार्गे वळवली व हा परिसर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व पोलीस रात्री उशिरापर्यंत येथे ठाण मांडून होते. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.