
संगमेश्वर तालुक्यातील कुळे अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा कुळे येथे अमेरिकेतील परदेशी पाहुण्यांनी नुकतीच भेट देवून शैक्षणिक उपक्रमाबाबत माहिती घेतली. या अभ्यास दौऱ्यात त्यांनी हिंदुस्थानी ग्रामीण शिक्षण व्यवस्था, अंगणवाडीतील उपक्रम आणि स्थानिक जीवनशैली यांचा अनुभव घेतला.
या विशेष भेटीदरम्यान पाहुण्यांसोबत असलेल्या गोडबोले यांनी त्यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख करून देताना पंढरपूर वारी, वारकरी संप्रदाय, तसेच संत परंपरेचे महत्त्व यावर सखोल माहिती दिली. त्यांनी वारकऱ्यांचा भक्तिपंथ, विठोबा भक्ती आणि समाज प्रबोधनातील संतांचा मोलाचा वाटा याबाबतही चर्चा केली. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका साळवी यांनी पाहुण्यांना कुळे गावाचे ग्रामदैवत श्री नवलादेवी मंदिर, मंदिराजवळील देवराईचे पर्यावरणीय व धार्मिक महत्त्व, तसेच गावकऱ्यांचे राहणीमान, पारंपरिक जीवनशैली आणि संस्कृती यांची ओळख करून दिली. या दौऱ्यामुळे परदेशी पाहुण्यांना ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंची जवळून ओळख झाली. ग्रामस्थांनीही त्यांच्या स्वागतासाठी विशेष उत्साह दाखवला. हा अनुभव दोन्ही समुदायांसाठी समृद्ध करणारा ठरला.