
गुहागर तालुक्यातील मुंढर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून वाघ आणि बिबट्याची 18 नखे जप्त केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुहागरमधील मुंढर येथे काही इसम वन्य प्राणी वाघाची नखे विक्रीकरता घेऊन येणार असल्याचे समजले. त्या आधारे मुंढर फाटा ते गिम्हवी या रस्त्यावर दोन इसम एका मोटारसायकलसह संशयास्पदरित्या फिरताना दिसले. त्यांची झडती घेण्यात आली असता त्या दोन इसमांपैकी दिलीप सिताराम चाळके याच्या ताब्यातून वन्य जीव वाघ व बिबट्याची 18 नखे जप्त करण्यात आली. याबरोबरच या आरोपींकडे असलेली मोटारसायकल व मोबाईल फोन अशी वर नमूद नख्यांची किंमत वगळता 58 हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
याबाबत पोलीस हवालदार शांताराम रामचंद्र झोरे, नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या फिर्यादीवरून गुहागर पोलीस ठाण्यात वन्य जीव प्राणी संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी दिलीप सिताराम चाळके, वय 40, रा. चाळकेवाडी, मुंढर, ता. गुहागर आणि अक्षय आत्माराम पारधी, वय 24, रा. आमशेत, पेवे, भोईवाडी, ता. गुहागर यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम करत आहेत. या कामगिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, नितीन डोमणे, बाळू पालकर, उत्तम सासवे, दत्तात्रय कांबळे यांच्यासह वनरक्षक संजय दुंडगे यांनी सहभाग घेतला.




























































