रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे निधन

198
umesh-shetye

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उमेश शेट्ये यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

उमेश शेट्ये हे रत्नागिरीतील हरहुन्नरी नेतृत्व होते. 1991 ला रत्नागिरी नगरपरिषदेत ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये ते रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले. 2001 मध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत उमेश शेट्ये दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले. 2006 च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी नगराध्यक्ष पदाची संधी हुकल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2011 च्या नगरपरिषद निवडणूकीत शिवसेनेतून ते पुन्हा एकदा नगरसेवक झाले. दोन वेळा शिवसेनेकडून कोंकण स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषद निवडणूक लढवली. 2014 मध्ये शिवसेनेचा राजीनामा देऊन उमेश शेट्ये यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले. उमेश शेट्ये यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत रत्नागिरी शहरात अनेक विकास कामे झाली. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह, जलतरण तलाव, उद्याने अशी कामे त्यांनी केली. नगरपरिषदेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आणि अभ्यास त्यांच्याजवळ होता.

आपली प्रतिक्रिया द्या