
रत्नागिरीतील चवे येथे चिरे कापणीचे मशीन अंगावर पडल्याने कामगाराचा पाय कापला गेला. जखमी अवस्थेत त्या कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या कामगाराचा मृत्यू झाला आहे.
रवी बापू जाधव (35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सोलापूर येथील मुळ रहिवाशी असून सध्या ते रत्नागिरी येथील चवे फाटा येथे राहत होते. रत्नागिरी तालुक्यातील चवे फाटा गावातील चिरेखाणीवर विनोद शिंदे हे मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यांना फोन आला म्हणून त्यांनी चिरेखाणीचे मशीन बंद करून फोन घेतला. ते फोनवर बोलत असतानाच चिरेखाणीवर काम करत असलेला रवी जाधव हा कामगार कामावर आला आणि त्याने बंद केलेले मशीन चालू केले. रवीला मशीन चालवता येत नसल्याने मशीन उडाले. त्याबरोबर रवीदेखील उडाला आणि मशीनच्या ब्लेडवर त्याचा पाय कापला गेला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला
























































