
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी आज बिनविरोध निवडणूक पार पडली़. अध्यक्षपदी विक्रांत भास्कर जाधव यांची निवड झाली़. सभापती पदी परशुराम कदम, चंद्रकांत मणचेकर, रेश्मा झगडे आणि भारती सरवणकर यांची निवड झाली़. विजयानंतर शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी आज शामराव पेजे सभागृहात आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव, समाजकल्याण सभापती पदासाठी परशुराम कदम आणि महिला बालकल्याण सभापती पदासाठी भारती सरवणकर, अन्य सभापती पदांसाठी रेश्मा झगडे, चंद्रकांत मणचेकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. साडेबारा वाजता उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. रेश्मा झगडे यांना कृषी आणि पशुसंवर्धन समिती आणि चंद्रकांत मणचेकर यांना शिक्षण आणि अर्थ समिती देण्यात येणार असून त्याचे वाटप उद्या सकाळी होणाऱ्या बैठकीत करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी विक्रांत जाधव यांची निवड झाल्यानंतर शिवसेना उपनेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी अभिनंदन केले. यावेळी उपाध्यक्ष महेश नाटेकर, रत्नागिरी सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या समन्वयक नेहा माने, जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख वेदा फडके, गटनेत्या रचना महाडीक, उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, माजी सभापती ऋतुजा जाधव, विक्रांत जाधव यांच्या आई, पत्नी आणि इतर कुटूंबीय, सदस्य उदय बने, सभापती जया माने, प्रमिला कानडे, माजी सभापती महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
वयाच्या 29 व्या वर्षी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा अध्यक्ष होण्याचा मान विक्रांत जाधव यांनी पटकावला आहे. वयाच्या 29 व्या वर्षी विक्रांत जाधव अध्यक्ष पदावर निवडून आले. त्यांच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम झाला आहे तो म्हणजे एकाच टर्ममध्ये विरोधी पक्षनेता आणि जिल्हा परिषद अध्यक्षही होण्याचा. आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांची आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.
या निमित्ताने आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या कुटूंबाच्या राखलेल्या एकीचे दर्शन झाले. संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये याची चर्चा सुरु होती़. विक्रांत जाधव यांच्या निवडीच्या वेळी त्यांची तर उपस्थित होतीच. पण त्यांच्या सुनांच्या माहेरची मंडळीदेखील आवर्जून उपस्थित होती़. यामध्ये सोलापूर येथून विक्रांत यांचे सासूसासरे गादेकर कुटुंबीय, आमदार जाधव यांचे मोठे चिरंजीव समीर यांचे सासूसासरे माने कुटूंबीय कोल्हापूर येथून आले होते.
नाशिक येथून त्यांची कन्या कीर्ती पाटील आणि त्यांचे कुटूंबीय तर दुसरी कन्या कांचन आणि त्यांचा परिवारदेखील यावेळी उपस्थित होता. आमदार जाधव यांचे भाऊ, बहिणी आणि त्यांची मुले आणि कुटुंबीय अशा कुटुंबातील शेकडोंच्या उपस्थितीने जिल्हा परिषद दालन भरुन गेले होते. त्यातून आमदार जाधव यांनी त्यांच्या कुटुंबातील एकी किती मजबूत ठेवली आहे याचे दर्शन प्रत्येकाला होत होते.
येणार्या अडचणींचा सामना करत विकासकामे सुरु ठेवू – विक्रांत जाधव
जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर विक्रांत जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गतवर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने घेरले आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संकटं येत आहेत. पण संकटं आली म्हणून शांत न बसता संकटांशी सामना करत आम्ही आमची विकासकामे सुरुच ठेवू़. मला मिळालेल्या कालावधीचा विचार केला तर जास्तीत जास्त प्रयत्न करुन जिल्ह्यात विकासकामांना प्राधान्य देऊ. माझे वडील भास्कर जाधव हे 1992 च्या काळात जिल्हा परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते होते. त्यांच्यासारखे काम करत त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून प्रशासनाकडून चांगले काम करुन घेईन. मी स्वतःला नशीबवान समजतो की कमी वयात मला अध्यक्ष होण्याची संधी मिळाली अशी कबुली विक्रांत जाधव यांनी दिली.
उदय बनेंना उपाध्यक्ष, रचना महाडीक गटनेत्या
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी उदय बने यांचे नाव शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यमान सभापती महेश नाटेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी रचना महाडीक यांची निवड करण्यात आली.


























































