
दुर्गेश आखाडे । रत्नागिरी
राज्यमंत्र्यांचा दर्जा असूनही जिल्हापरिषद अध्यक्षांकडे ओळखपत्र नाही म्हणून मंत्रालयाच्या दारात अडवणूक होत आहे. जिल्हापरिषद उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींची अवस्था काही वेगळी नाही. जिल्हापरिषदेचे हे सर्व पदाधिकारी ओळखपत्राच्या प्रतिक्षेत आहेत यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपला तरी त्यांना ओळखपत्र मिळाले नव्हते.
जिल्हापरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम व आरोग्य सभापती, शिक्षण व अर्थ सभापती, समाजकल्याण सभापती आणि महिला व बालकल्याण सभापती यांना मंत्रालयात तसेच विविध खात्याच्या मंत्र्यांच्या दालनात बैठकांना जावे लागते. अशावेळी ओळखपत्र नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांची गोची होते. मंत्रीमहोदयांचे जिल्ह्यात दौरे आणि विविध विषयांवर बैठका असतात अशावेळी मंत्र्यांचे सुरक्षारक्षक जनतेतून निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना अडवतात आणि ओळखपत्र विचारतात तेव्हा ते अपमानास्पद वाटते.
जिल्हापरिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी एक किस्सा सांगितला ते म्हणाले की, ‘मी गुहागर तालुक्यात आबलोली गावात गेलो तेव्हा तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मला ओळखपत्र आहे का? असे विचारले. तेव्हा मला कळलं की ओळखपत्र असायला हवं कारण सगळेच लोक आपल्याला चेहऱ्याने आणि नावाने ओळखत नसतात’, असे बेटकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
जिल्हापरिषद पदाधिकाऱ्यांचा कालावधी हा पंधरा महिन्यांचा आहे त्यापैकी दोन महिने तर संपले आहेत आता अजून किती महिने ओळखपत्राची वाट पहावी लागणार असा प्रश्न पदाधिकारी मंडळींना पडलाय. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा सवा वर्षांचा कालवधी संपला तरी ओळखपत्र मिळाले नाही.






























































