हिंदुस्थान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लड हे चार संघ उपांत्य फेरी गाठतील, रवी शास्त्री यांचे  भाकित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषक केवक दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या विश्वचषकामध्ये चार संघ उत्तम फॉर्मात दिसत आहेत. त्यामुळे माझ्या मते हिंदुस्थान, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील, असा विश्वास हिंदुस्थानचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.

23 ऑक्टोबरपासून हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याने आगामी टी-20 विश्वचषकाचे बिगुल वाजणार आहे. त्यापुर्वी सोमवारपासून (दि. 16) ग्रुप स्टेजच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. आगामी विश्वचषकात यंदा कोण बाजी मारेल यावर अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यानुसार हिंदुस्थानचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील भाकीत व्यक्त केले आहे.

श्रीलंका, न्यूझीलंड ठरू शकतात ‘डार्क हॉर्स’

यावर्षीच्या विश्वचषकापूर्वी झालेल्या मालिकांमधील कामगिरीनुसार  चार संघ चांगल्या फॉर्मात आहेत. हिंदुस्थान, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ उपांत्य फेरीत  पोहोचतील. मात्र, या स्पर्धेत श्रीलंका आणि न्यूझीलंड हे संघ  डार्क हॉर्सही ठरू शकतात. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात चांगलीच चुरस पाहायला मिळेल, असे प्रतिपादन शास्त्री यांनी केले आहे.

विश्वचषकापूर्वी बुमराह, चहरला खेळवणे योग्यच होते

विश्वचषकाच्या काही दिवसांपूर्वी बुमराह आणि चहर हे प्रमुख गोलंदाज तंदुरूस्त झाले होते. मला विचाराल तर विश्वचषकापूर्वी या खेळाडूंना खेळवणे योग्य होते. कारण जोपर्यंत खेळाडूंना खेळवले जात नाही तोपर्यंत त्यांच्या तंदुरूस्तीबाबत काही समजत नाही. मात्र, आगामी विश्वचषकात अशा दुखापती टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतात, असे शास्त्री म्हणाले.