IPL इतिहासात पहिल्यांदा ‘असं’ घडलं, गोलंदाजानं बाद न करता फलंदाजानं मैदान सोडलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2022) मध्ये रविवारी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स संघामध्ये अटीतटीचा सामना खेळला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेला हा सामना राजस्थान रॉयल्सने 3 रनने जिंकला. या विजयासह राजस्थानचा संघ गुणतालिकेमध्ये नंबर एकवर पोहोचला आहे. याच लढतीमध्ये राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू आर. अश्विन याच्या नावावर एका अजब विक्रमाची नोंद झाली आहे.

लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. 67 धावांमध्ये राजस्थानने चार विकेट्स गमावल्या. यानंतर मैदानात उतरलेला हेटमायर आणि आर. अश्विन यांच्यात अर्धशतकीय भागिदारी झाली. हेटमायर याने अखेरपर्यंत नाबाद रहात 36 चेंडूत 6 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 59 धावा चोपल्या, तर आर. अश्विन याने 28 धावा केल्या.

या लढतीमध्ये आर. अश्विन याने याला एकही गोलंदाज बाद करू शकला नाही. मात्र डावाच्या 19 व्या षटकातील दुसरा चेंडू खेळल्यानंतर तो रिटायर्ड आऊट झाला. आयपीएलच्या इतिहासामध्ये एखादा खेळाडू रिटायर्ड आऊट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अश्विनने 23 चेंडूत 28 धावांची खेळी केली, या दरम्यान त्याने दोन षटकारही ठोकले. फलंदाजीदरम्यान अश्विन थकल्यासारखा वाटत असल्याने त्याला रिटायर्ड आऊट होण्यास सांगण्यात आले आणि ताज्या दमाच्या रियान परागला मैदानात उतरवण्यात आले. त्याने चार चेंडूत आठ धावा केल्या.

दरम्यान, वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान राफेल बिशप यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आणि टी-20 मधील ही शानदार रणनिती असल्याचे म्हटले आहे. अश्विनचे रिटायर्ड आऊट होणे टी-20 मधील शानदार रणनिती आहे. 21 व्या शतकातील खेळाची आपण ज्या प्रकारे कल्पना करतो त्या पद्धतीचा टी-20 आपल्याला पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करत आहे, असे ट्विट बिशप यांनी केले आहे.

काय आहे नियम?

जेव्हा एखादा फलंदाज पंच किंवा विरोधी संघाच्या कर्णधाराशी सल्लामसलत न करता मैदान सोडतो तेव्हा त्याला निवृत्त समजले जाते. नियमानुसार त्याला बाद मानले जाते. एकदा फलंदाज अशा पद्धतीने निवृत्त झाल्यावर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.