Asia Cup 2022 टीम इंडियाला तगडा धक्का, अष्टपैलू रविंद्र जाडेजा स्पर्धेतून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा रंगात आलेली असताना टीम इंडियाला तगडा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. रविंद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेल यांना संधी मिळाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली.

रविंद्र जाडेजा याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर असल्याने तो आशिया कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. रविंद्र जाडेजा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

दरम्यान, रविंद्र जाडेजा याच्या जागी निवड समितीने अक्षर पटेल याची संघात निवड केली आहे. याआधी तो आशिया चषक स्पर्धेसाठी त्याची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु आता जाडेजा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला खेळण्याची संधी मिळेल. यासाठी तो लवकरच दुबईमध्ये टीम इंडियासोबत जोडला जाईल.

रविंद्र जाडेजा हा टीम इंडियाचा आधारस्तंभ आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये तो गेल्या काही काळापासून दमदार कामगिरी करतोय. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत त्याला फलंदाजीमध्ये बढतीही देण्यात आली होती. त्याने या लढतीत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळीही केली होती. तसेच हाँगकाँगविरुद्ध त्याने एका अप्रतिम थ्रोवर खेळाडूला बादही केले होते. मात्र आता तोच स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने टीम इंडियापुढील आव्हान वाढले आहे.

सुपर-4मध्ये एन्ट्री

दरम्यान, टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये पोहोचली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्सने आणि दुसऱ्या लढतीत दुबळ्या हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला होता.