रवींद्र नाट्यमंदिराचा पडदा रविवारी उघडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुल नूतनीकरणानंतर नव्या दमाने नाटय़रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्याचा उद्घाटन सोहळा रविवार, 2 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. खरं तर उद्घाटन सोहळा शुक्रवार, 28 फेब्रुवारी रोजी नियोजित करण्यात आला होता. तशी निमंत्रणे सर्वांना पाठवण्यात आली होती, मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली नसल्याने सोहळा दोन दिवस पुढे ढकलण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, 2 मार्चला नूतनीकृत संकुलाचे लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. याशिवाय नाटय़, चित्रपट, चित्र, शिल्प अशा सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी दिली.

रवींद्र नाटय़मंदिराच्या नूतनीकरणानंतर प्रथमच 3 मार्च 2025 रोजी एकदिवसीय पु. ल. कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध भाषांत पु. ल. देशपांडे यांचे साहित्य प्रसारित व्हावे, या उद्देशाने सदर महोत्सवात बंगाली भाषेत ‘आमार देखा किचू नमुना’ हे नाटक सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या अतिशय लोकप्रिय ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील काही व्यक्तिरेखांवर आधारित हा नाटय़ाविष्कार रुपांगगण फाऊंडेशन सादर करणार आहे. तसेच या दिवशी पार्थ थिएटर्स, मुंबईतर्फे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले ‘मॅड सखाराम’ हे नाटकसुद्धा सादर केले जाणार आहे.

4 मार्च रोजी ‘महिला कला महोत्सव’ आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमात लावणी आणि शास्त्रीय गायन सादर होईल. रेश्मा मुसळेकर आणि संच मिळून लावणी नृत्य कार्यक्रम सादर करतील आणि विदुषी अपूर्व गोखले आणि विदुषी पल्लवी जोशी यांचे शास्त्रीय गायन प्रेक्षकांना ऐकण्यास मिळेल. सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होतील

प्रत्यक्ष बुकिंग एप्रिल महिन्यात

रवींद्र नाटय़मंदिरचे उद्घाटन जरी 2 मार्च रोजी जरी झाले तरी प्रत्यक्ष बुकिंग नियमित कार्यक्रम सुरू व्हायला एप्रिल महिना तरी उजाडेल, असे समजतंय.