
केंद्र व राज्य शासनाकडून जनतेच्या मतांचा सतत अनादर होत आहे. देशात व राज्यात सध्या जनकल्याणकारी कामे कमी परंतु घोषणाबाजी अधिक अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनतेत तीव्र नाराजी दिसून येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांतर्गत येत्या गणेश चतुर्थीच्या पर्वावर ‘होऊ द्या चर्चा ‘ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून जनतेच्या मतांचा अनादर करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या अनागोंदी कारभाराचा ठिकठिकाणी जाऊन भांडाफोड करा, असे आवाहन पक्षाचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी केले आहे.
भद्रावती तालुक्यात ग्रामीण व शहरी क्षेत्रात ‘होऊ द्या चर्चा’ अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, युवा व युवती सेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, वरोरा-भद्रावती विधानसभा सघंटक वैभव डहाने, विधानसभा समन्वयक मगेश भोयर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, राहुल मालेकर, माया नारळे, अश्लेषा जीवतोडे-भोयर, माया टेकाम, भावना खोब्रागडे, शीला आगलावे, माजरी शहर प्रमुख रवी रॉय, मुधोलीचे सरपंच बंडू नन्नावरे, माजी सैनिक विजय तेलरांधे, कॅप्टन विलास देठे, शिव गुडमल, रवी भोगे, रोहण कुटेमाटे, विश्वास कोंगरे व प्रशांत कारेकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांनी प्रास्ताविकातून या अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी भद्रावती तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.