
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीवर होऊ घातलेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला असून इसिसच्या दहशतवाद्याला अटकही केली आहे. इसिसच्या गोटात शिरकाव करत रॉने या दहशतवाद्याचा माग काढला होता आणि सप्टेंबर २०१७मध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र, या वृत्ताची माहिती आता देण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.
अतिशय धाडसी अशा या गुप्तमोहिमेत रॉने इसिसच्या माहितीच्या देवाण-घेवाण यंत्रणेत शिरकाव केला. सुमारे १८ महिने अफगाणिस्तान, दुबई आणि नवी दिल्लीत ही मोहीम राबवली गेली. या मोहिमेअंतर्गत इसिसला येणारे किंवा केले जाणारे फोन, बँकेचे व्यवहार इत्यादींना ट्रेस करत त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्यात आली. या १८ महिन्यांच्या मेहनतीला तेव्हा यश मिळालं जेव्हा रॉच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली. या माहितीनुसार, इसिसचे १२ दहशतवादी प्रमुख शहरांवर आत्मघाती हल्ले करणार होते. त्यासाठी त्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात येत होतं. तसंच दुबईतून अफगाणिस्तानमध्ये ५० हजार डॉलर्सचा व्यवहार झाल्याचंही समोर आलं. या व्यवहाराचा माग काढत असताना अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी रॉला संभावित हल्ल्यांसाठीच्या शहरांमध्ये नवी दिल्लीचा समावेश असल्याची माहिती दिली. दिल्लीत हल्ला करण्यासाठी एका श्रीमंत अफगाणी व्यापाऱ्याच्या मुलाची निवड करण्यात आली होती.
रॉला या तरुणाचं वर्णनही कळलं होतं. त्यानुसार दहशतवादी दिल्लीला आल्यानंतर रॉने एका एजंटच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला. एजंटने त्याच्याशी मैत्री केली. मात्र, हा एजंट रॉचा माणूस असल्याची सुतरामही कल्पना दहशतवाद्याला नव्हती. आपल्या मिशनच्या पूर्ततेसाठी एका खासगी इंजिनिअरिंग महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला होता. सुरुवातीला तो हॉस्टेलवर राहत होता, मात्र नंतर त्याने लाजपत नगर येथे एक स्वतंत्र खोली भाड्याने घेतली. एजंटनेच त्याला घर मिळवून दिलं, जेणेकरून त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. नवीन घरात राहायला गेलेल्या दहशतवाद्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी रॉने ८० जणांचा चमू नेमला होता. त्यानुसार, त्याच्या प्रत्येक हालचालीचा माग काढत हल्ल्याचा दिवस आणि वेळही शोधली गेली. हल्ल्यासाठी घर मिळवून देणाऱ्या एजंटनेच त्याला विस्फोटकं पुरवली. पण, या विस्फोटकांमध्ये ट्रिगर दिला गेला नव्हता.
हल्ल्याच्या तयारीत असलेल्या या दहशतवाद्याच्या रॉने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून २२ मे २०१७ रोजी युनायटेड किंग्डम येथील मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटांमागे इसिसचा हात असल्याचा रॉचा अंदाज आहे. कारण, दिल्ली येथील हल्ल्यांसाठी जी विस्फोटकं दहशतवाद्याने मागवली होती, तशाच प्रकारची विस्फोटकं मॅन्चेस्टर स्फोटातही वापरली गेली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबानी तळांवर हल्ले केले होते, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
























































