बंगळुरूच्या पराभवाचा षटकार, दिल्लीचा 6 गडी राखून विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

रथी महारथी खेळाडूंनी सजलेल्या विराट कोहलीच्या रायल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा षटकार पाहण्याची नामुष्की ओढावली. दिल्ली कॅपिटलने बंगळुरूवर 6 गडय़ांनी मात करत स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला. 67 धावांची खेळी करणारा दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर सामन्याचा मानकरी ठरला. ‘आयपीएल’च्या इतिहासात सलग सहा पराभवांचा सामना करणारा बंगळुरू हा दुसरा संघ होय. या पराभवाच्या षटकारासह बंगळुरूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे.

पृथ्वीने ठोकले सलग पाच चौकार
बंगळुरूकडून मिळालेले 150 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटलने 18.5 षटकांत 6 बाद 152 धावा करून पूर्ण केले. टीम साऊथीने तिसऱयाच चेंडूवर शिखर धवनला शून्यावर नवदीप सैनीकरवी झेलबाद करून बंगळुरूला सनसनाटी सुरुवात करून दिली, मात्र साऊथीच्या पुढच्याच षटकात दुसरा आघाडीवीर पृथ्वी शॉने सलग पाच चौकार ठोकले. त्यातील पाचवा चौकार लेगबाइज होता. पृथ्वीने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. 22 चेंडूंत 5 चौकारांसह 28 धावांची देखणी खेळी करणाऱया पृथ्वीला पवन नेगीने अक्षदीप नाथकरवी झेलबाद केले.

अय्यरचा कॅप्टन्सनॉक
सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीची सूत्रे स्वतःकडे घेत 67 धावांची कॅप्टन्सनोक खेळी केली. त्याने 50 चेंडूंत 8 चौकारांसह 2 षटकार लगावले. दरम्यान, कोलिन इनग्रॅमने 22 धावांची खेळी केली. त्याला मोईन अलीने पायचित केले. विजयासाठी 5 धावांची गरज असताना 18 व्या षटकात अय्यरही नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर दीपक चहरकरवी झेलबाद झाला. सैनीने ख्रिस मॉरिसला एबी डिव्हिलियरकरवी शून्यावर झेलबाद करून बंगळुरूला पाचवे यश मिळवून दिले. विजयासाठी 3 धावांची गरज असताना रिषभ पंत 18 धावांवर बाद झाला. त्याने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर साऊथीकडे झेल दिला. त्यानंतर अक्षर पटेल (नाबाद 4) व राहुल तेवातिया (नाबाद 1) यांनी 7 चेंडू शिल्लक ठेवून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. बंगळुरूकडून सैनीने 2, तर साऊथी, नेगी, सिराज व अली यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.

बंगळुरूची दिल्लीच्या विक्रमाशी बरोबरी
‘आयपीएल’च्या इतिहासात सलग सहा पराभवांचे तोंड पाहणार रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू हा दुसरा संघ ठरला. याआधी दिल्ली डेअरडेविल्सला 2013च्या ‘आयपीएल’मध्ये सलग सहा पराभवांना सामोरे जावे लागले होते. डेक्कन चार्जर्स हैदराबाद व मुंबई इंडियन्स या संघांनी सलग पाच पराभव पाहिलेले आहेत. हैदराबादवर 2012 मध्ये, तर मुंबईवर 2014 मध्ये ही नामुष्की ओढावली होती, मात्र मुंबईने लागोपाठच्या पाच पराभवांनंतरही जबरदस्त पुनरागमन करत प्ले ऑफपर्यंत धडक मारली होती.

बंगळुरूला रबाडाचा दणका
त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 बाद 149 धावसंख्या उभारली. यात कर्णधार विराट कोहली (41) व मोईन अली (32) यांनीच काय तो दिल्लीच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. कॅगिसो रबाडाने कोहलीसह एबी डिव्हिलियर्स (17), अक्षदीप नाथ (19) व पवन नेगी (0) या 4 फलंदाजांना बाद केले. पार्थिव पटेल (9), मार्कस स्टोइनिस (15) हे फलंदाजही आज करामत करू शकले नाहीत.