
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर हिंदुस्थानचा संघ वर्ल्डकप 2019 मधून बाहेर झाला आहे. या पराभवासह कोट्यवधी लोकांच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नांचा देखील चक्काचूर झाला आहे. शेवटपर्यंत जाडेजा आणि धोनीने दमदार फलंदाजी करत विजयाच्या आशा जागवल्या, परंतु ऐनवेळेस विकेट गेल्याने हिंदुस्थानला 18 धावांनी पराभव सहन करावा लागला. टीम इंडियाच्या पराभवाबाबत सोशल माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या वर्ल्डकपच्या लिग स्टेजमध्ये हिंदुस्थानने दमदार कामगिरी केली. 8 पैकी 7 लढतीत विजय मिळवून सेमी फायनलमध्ये झोकात प्रवेश केला. टीम इंडियाच्या या विजयांमध्ये सर्वाधिक योगदान हे पहिल्या तीन-चार फलंदाजांनी दिले. परंतु मधली फळी साफ कोसळल्याचे दिसून आले. शेवटपर्यंत चौथ्या स्थानावर कोण खेळणार, धोनीचा फॉर्म यावर तोडगाच काढता आला नाही. धोनीने सेमी फायनलमध्ये 50 धावांची खेळी केली असली तरी त्याने खूपच चेंडू खाल्ल्याने नेटिझन्सने त्यालाही ट्रोल केले आहे. टीम इंडियाच्या पराभवाची काय आहेत कारणं पाहूया…
नाणेफेक –
मॅन्चेस्टरमध्ये हिंदुस्थानने यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध 1999 आणि 2019 मध्ये लढती खेळल्या होत्या. या दोन्ही लढतीत हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना विजय मिळवला होता. परंतु या लढतीत मात्र न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि टीम इंडियावर दबाव आणला.
ढिसाळ क्षेत्ररक्षण –
संपूर्ण स्पर्धेत आपल्या क्षेत्ररक्षणाने छाप सोडलेला हिंदुस्थानचा संघ सेमी फायनलमध्ये मात्र ढासळलेला दिसला. ढिसाळ क्षेत्ररणामुळे हिंदुस्थानने जवळपास 20 धावा अतिरिक्त दिल्या. याच धावा हिंदुस्थानला जड गेल्याचे दिसले.
स्वींगला तोड नाही –
पाटा खेळपट्टीवर धडाधड फलंदाजी करणारे फलंदाज बोल्ट आणि हेन्रीच्या स्वींग होणाऱ्या गोलंदाजीपुढे फेल झाले. या दोघांनी मिळून सेमी फायनल लढतीत 5 बळी घेतले.
खराब सुरुवात –
वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 5 शतकं झळकावणारा रोहित, श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकणारा राहुल आणि कर्णधार विराट स्वींग होणाऱ्या चेंडूवर खराब शॉट खेळून बाद झाले. तिन्ही खेळाडूंनी प्रत्येकी फक्त एक धाव केली. पहिल्या पाच षटकात तीन बळी गमावल्याने हिंदुस्थानचा संघ दबावात आला.
चौथ्या नंबरचे लफडे सुरुच –
वर्ल्डकपच्या सुरुवातीपासून चौथ्या नंबरचे लफडे सुरू आहे. आधी शंकर, मग पंत. पंत हा आक्रमक खेळाडू असला तरी आडव्या बॅटने फटके मारतो. त्यामुळे त्याच्या निवडीवर अनेकांनी आक्षेप घेतले होते. सुरुवातीचे खेळाडू ढेपाळल्यावर चौथ्या नंबरवरील खेळाडू अधिक जबाबदार असायला हवा. परंतु पंतने अवसानघातकी फटका मारला आणि विकेट गमावली.
मधल्या फळीला वाली कोण?
वर्ल्डकप सुरु झाल्यापासून मधल्या फळीत जम बसवून अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज हिंदुस्थानला मिळाला नाही. कधी जाधव, कधी कार्तिक, तर कधी धोनी. या प्रत्येक खेळाडूने निराशाजनक कामगिरी केली आहे.
धोनीच्या संथ खेळावरही प्रश्नचिन्ह –
नेटिझन्सकडून धोनीच्या संथ खेळीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जाडेजासोबत धोनीने 100 धावांची भागिदारी केली असली तरी 70 टक्के योगदान यात जाडेजाचे होते. धोनीने जास्त चेंडू खेळल्याने आवश्यक रनरेटही वाढला. 50 धावांसाठी धोनीने 72 चेंडू घेतल्याने आणि मोक्याच्या क्षणी धावबाद झाल्याने त्याच्यावर टीका होत आहे.





















































