बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीला पाठिंबा देणारेच काही आमदार आपल्याच सरकारविरोधात गुवाहाटीमध्ये लपून बसले आहेत. यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी बुधवारी आपला मुक्काम गुवाहाटीतून आता गोव्याला हलवला आहे. गुरुवारी ते मुंबईत पोहोचणार आहेत. बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे सर्वजण पहिल्यांदाच हॉटेलबाहेर पडले आणि त्यांनी गुवाहाटी येथील कामाख्या देकीचे दर्शन घेतले.

मुंबईला सीआयएसएफचे सुरक्षा कवच

बंडखोर आमदार मुंबईत येणार असल्याने शिवसैनिक व नागरिकांच्या संतापाचा भडका उडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांकडून विविध पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱयांना 149 ची नोटीसदेखील बजावली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबईत हजारो सीआयएसएफ जवानांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हनंतर रात्री उशिरा साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्वतः गाडी चालवत राजभवनवर गेले आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार अनिल परब, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱहे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, रमेश कोरगावकर, संतोष बांगर तसेच अन्य आमदार उपस्थित होते.