
चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनावणे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सोनावणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा निर्णय कायम ठेवत त्यांची त्या विऱोधातील याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता लता सोनावणे यांच्या आमदारकीवरच टांगती तलवार आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून लता सोनावणे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या आमदारांपैकी त्या देखील एक आहेत. लता सोनावणे यांनी विधानसभा निवडणूकीच्या वेळीटोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र ते प्रमाणपत्र अवैध असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केला होता. त्यांनी नंदुरबार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर समितीने सोनावणे यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते.
समितीच्या या निर्णयाविरोधात सोनावणे यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंजपीठात याचिका दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश समितीला दिले होते. मात्र समितीने पूर्वीचा निर्णय काम ठेवल्याने लता सोनावणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी त्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. 9 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत त्यांनील जातपडताळणी समितीची निर्णय कायम ठेवला आहे.



























































