
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली तेव्हा सुशांत सावंत या तरुणाने मुंबई सोडली आणि त्याने थेट कोकणातील आचरा गाव गाठले. गावातील देव मळ्यात लाल तांदळाची शेती केली आणि आज या पारंपरिक तांदळाचा ब्रॅण्ड करण्यासाठी सुशांत सावंत प्रयत्न करत आहे.
मुंबईतील नोकरी सुटल्यावर सुशांत सावंत याने गावाकडे परतायचे ठरवले. आचऱयाला त्याचे स्वतŠचे दोन एकर शेत होतं. त्याच्या शेतात पारंपरिक पद्धतीने लाल तांदूळ पिकतो. गावात अन्य शेतकरीदेखील लाल तांदळाचे पिक घेतात. नागझरी तलावाच्या पाण्यावर वायंगणी भात शेती केली जाते. देवमळ्यात पिकणारा भात देवभात म्हणून ओळखला जातो.
शहरातील लोकांना पांढरा तांदूळ माहीत असतो. भरपूर पोषकमूल्ये असलेला हातसडीचा तांदूळ शहरांतील लोकांना मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सुशांत सावंत याने सांगितले.
पिढीजात सोरटी वाणाचं देणं
सुशांतने त्याच्या आज्याने जपलेलं सोरटी वाण वापरून लाल तांदूळ पिकवला आहे. त्यामध्ये भरपूर पोषणमूल्ये आहेत. गावातील सर्वांनी पिकवलेला लाल तांदूळ आचऱयाबाहेर पोचावा यासाठी सुशांत प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रयत्नाला चांगलेच यश येत आहे. मुंबई, पुण्यातून लाल तांदळाबाबत विचारणा करणारे हजारो फोन त्यांना येत आहेत. कापडाच्या पिशव्यांमध्ये तांदूळ पॅक करून ऑर्डरप्रमाणे पाठवला जात आहे.

































































