अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरू, बालताल-चंदनवारीमार्गे यात्रा करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंची नोंदणी आजपासून सुरू करण्यात आली. बालताल आणि पहलगाम येथील चंदनवारी या दोन मार्गाने यात्रेकरूंना यात्रा करता येणार आहे. मात्र, निश्चित दिवस आणि मार्ग याचा परवाना घेतल्याखेरीज कोणालाही अमरनाथ यात्रा करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पंजाब नॅशनल बँक, जम्मू आणि कश्मीर बँक व यस बँकेच्या देशभरातील 440 शाखांतून अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करता येणार आहे. अमरनाथ यात्रा यंदा 46 दिवस चालणार आहे. 1 जुलै रोजी अमरनाथ यात्रेस प्रारंभ होणार असून, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी 15 ऑगस्ट रोजी यात्रा समाप्त होणार आहे.

सध्या नोंदणी प्रक्रियेऐवजी काही मर्यादित यात्रेकरूंना ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा बोर्डाने दिली आहे. मात्र, दररोज मर्यादित संख्येनेच ऑनलाईन नोंदणी होणार आहे. यात्रेकरूंसाठी वेबसाईट तयार केली असून त्यावर राज्यनिहाय बँक शाखांची माहिती आणि यात्रेचा अर्ज उपलब्ध आहे. नोंदणी करताना यात्रेकरूंना आरोग्य दाखला जोडणे बंधनकारक आहे. आरोग्य दाखला देणाऱ्या डॉक्टर्सची राज्यनिहाय यादी बेवसाईटवर पाहता येईल.

अमरनाथ यात्रेसाठी 13 वर्षांखालील मुले, 75 वर्षांवरील वृद्ध महिला आणि पुरुष, तसेच 6 आठवड्यांवरील गरोदर महिलांना बंदी आहे. ज्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टरने यात्रा करावयाची आहे, त्यांना आगाऊ नोंदणी करणे आवश्यक नाही. हेलीकॉप्टरचे तिकीट हाच यात्रा परवाना असे. मात्र, त्यांना आरोग्य दाखला घेणे बंधनकारक आहे.