
नव्वदच्या दशकामध्ये जन्मलेल्या पिढीला रावळगाव आणि पान पसंद नावाचे चॉकलेट माहिती नसेल असे उदाहरण क्वचितच दिसेल. पण बालपणाचा काळ सुखी करणारे हे गोड गोड चॉकलेट बनवणारी ‘रावळगाव शुगर कंपनी’ आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीची झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंझ्युमर या कंपनीने रावळगाव शुगर कंपनी खरेदी केली आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची एफएमसीजी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्टसने रावळगाव शुगर कंपनी खरेदी केली आहे. यासाठी अंबानी यांनी 27 कोटी रुपये मोजले. यामुळे ट्रेडमार्ग, चॉकलेट बनवण्याची रेसिपी आणि इंटलेक्युअर प्रॉपर्टीचे अधिकार आता मुकेश अंबानी यांच्या कंपनीकडे आले आहेत. रावळगाव आणि पान पसंद बनवणाऱ्या या कंपनीने शुक्रवारी या व्यवहाराची माहिती दिली.
‘रावळगाव शुगर कंपनी’ची स्थापना उद्योजक वालचंद हिरानंद यांनी 1933मध्ये नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथे केली होती. 1942मध्ये या कंपनीने रावळगाव नावाचे चॉकलेट बनवण्यास सुरुवात केली. अल्पावधीमध्ये हे चॉकलेट बच्चे कंपनीच्या पसंतीत उतरले. त्यानंतर पान पसंद या चॉकलेटनेही लहानांपासून थोरांना वेड लावले. आताही या कंपनीकडे मँगो मूड, कॉफी ब्रेक, टूटी फ्रुटी, पान पसंद, चोको क्रीम आणि सुप्रीम यासारखे हे ब्रँड आहेत.
मात्र गेल्या काही काळापासून ही कंपनी आर्थिक समस्येशी सामना करत आहे. बाजारात स्पर्धा वाढल्याने कंपनीच्या नफ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने अंबानींसोबत व्यवहार केला.





















































