सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ठाकरे’ चित्रपट येत्या 25 जानेवारी जगभरात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांना ‘मानाचा मुजरा’ करण्याचा ऐतिहासिक सोहळा सोमवारी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. यावेळी क्रिकेट, संगीत, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्याला भावलेले, उमगलेले राजकारणापलीकडील बाळासाहेब उलगडले. आठवणींच्या जागराला नर्मविनोदी भाष्य आणि चौफेरे टोलेबाजीची साथ लाभलेला ‘मानाचा मुजरा’ उत्तरोत्तर रंगला. हा कार्यक्रम येत्या रविवार, 20 जानेवारी रोजी कलर्स वाहिनीवरून सायंकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने आयोजित केलेल्या ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला. ज्यांच्या कलागुणांवर बाळासाहेबांनी असीम प्रेम केले, ज्या माणसांना बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि सहवासाचे क्षण लाभले, ज्यांच्यासाठी बाळासाहेब जणू संकटमोचक बनले अशापैकी काही दिग्गजांनी बाळासाहेबांसोबतचे मनाच्या हळव्या कोपऱ्यातील ‘ते’ क्षण सर्वांसोबत शेअर केले. त्यामुळेच बाळासाहेबांना मानाचा मुजरा करण्याचा हा अनोखा सोहळा अधिक रंगतदार झाला. मग सुप्रियासमोर राज्यसभेचा उमेदवार उभा न करणाऱ्या दिलदार शत्रूची तारीफ करणारे शरद पवार असतील किंवा ‘तुझा फॉर्म परत येईल, तू शतक ठोकशील’ हे बाळासाहेबांचे धीराचे शब्द, हृदयात कोरलेत, असे सांगणारे लिटिल मास्टर सुनील गावसकर असतील. ‘साहेब वाघ आहेत वाघ’, असे म्हणणाऱ्या संजय दत्तचा किंवा पित्यासमान बाळासाहेबांच्या आठवणींचा जागर करणाऱ्या सुरेश वाडकर यांचा मानाचा मुजरा म्हणूनच आगळा ठरला. मग बाळासाहेबांच्या शनवारवाडय़ाच्या सभेचे गारुड घेऊन जगणारा सुबोध भावे कसा अपवाद राहील? याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी क्रिकेटपटू राजू कुलकर्णी, विनोद कांबळी, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनीही आठवणींतील बाळासाहेब उलगडले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार आणि ‘ठाकरे’ चित्रपटाचे निर्माते संजय राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, वायकॉम 18 चे सीओओ अजित अंधारे, बिझनेस हेड निखिल साने, वर्षा राऊत, सहनिर्मात्या पूर्वशी राऊत, विधिता राऊत आदी उपस्थित होते. केवळ सेलिब्रेटीच नव्हे तर सामान्य शिवसैनिकांच्या मनातील साहेबांविषयीच्या भावनाही यावेळी व्यक्त झाल्या. यावेळी ‘सूर नवा ध्यास नवा’चे छोटे ‘सूर’ वीर तसेच गायक अनिरुद्ध जोशी, मधुरा कुंभार, शरयू दाते यांच्या गीतांची सुरेख पर्वणी रसिकांना मिळाली.
लहानात लहान माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं- पवार
लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. बाळासाहेबांची मतं ठाम होती असे सांगतानाच शरद पवार म्हणाले, ‘आणीबाणीच्या काळात इंदिराजींना जाहीर पाठिंबा देण्याचं धाडस कुणामध्ये नव्हतं. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीविषयी विचारलेल्या प्रश्नावर दिलखुलास उत्तर दिले. बाळासाहेबांना सुप्रियाला पाठिंबा देण्यासाठी स्वतःचा उमेदवार तर दिला नाहीच, पण कमळीला सांभाळून घेतो असे सांगत भाजपचाही उमेदवार उभा राहू दिला नाही. त्यांनीच सुप्रियाला बिनविरोध राज्यसभेवर पाठवलं, असे सांगतानाच बाळासाहेबांना दिलदार म्हणायचं नाही तर काय? राजकारणात असे कोण कोणाला बिनविरोध पाठिंबा देतो का? अशी पुस्तीही पुढे जोडली.
शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा युती केली म्हणून इथपर्यंत पोहोचलो!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’
शिवसेना-भाजपची त्यावेळी युती झाली त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तेव्हा युती झाली नसती तर आमचा इथपर्यंत प्रवास झाला नसता, अशी ‘मन की बात’च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. आमच्या युतीच्या चर्चेमध्ये अडचण आली तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठय़ा मनाने निर्णय करायचे आणि त्यामुळे युती टिकायची. आताही आम्ही मार्ग काढू. चिंता कशाला करता, अशा शब्दांत फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केली.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता अतिशय मनमोकळेपणाने उत्तरे दिली. ते पुढे म्हणाले, कालानंतराने आमच्या युतीमध्ये अनेकदा अडचणीची वेळ आली, पण त्या अडचणीदेखील आम्ही दूर केल्या. आम्ही त्यावेळी लहान कार्यकर्ते होतो. आम्हाला त्यावेळेला ‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा. तेव्हा युतीच्या चर्चा काय व्हायच्या ते माहिती नाही. मात्र तेव्हा अडचण आली तर बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस मोठय़ा मनाने निर्णय करायचे. त्यामुळे युती टिकायची. तेव्हा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे होते. प्रमोद महाजन यांना बाळासाहेबांचा स्वभाव नीट माहिती होता. बाळासाहेबांशी बोलून कसा मार्ग काढायचा हे प्रमोद महाजन बघत असत. आता ती जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही मार्ग काढू. चिंता कशाला करता, असे उत्तर देताच सभागृहात एकच हशा उसळला.
बाळासाहेब येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची
शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी आदर्शच होते. माझा तो उमेदीचा काळ होता. बाळासाहेब बोलतात कसे ते डोळय़ात प्राण आणून बघायचो. बाळासाहेबांचे भाषण फारच अप्रतिम असायचे. निवडणुकीत जय होवो किंवा पराजय होवो, पण बाळासाहेब येऊन गेल्यानंतर जिंकल्याची मजा यायची. ही बाळासाहेबांच्या शब्दांत ताकद होती. मुलाखत देताना बाळासाहेब मनात असेल ते बोलायचे. लोकांना काय वाटेल याची त्यांनी कधीच चिंता केली नाही. जे मनात आहे ते बाळासाहेब बेधडक बोलायचे, असे मुख्यमंत्र्यांनी प्रांजळपणे कबूल केले.

































































