
‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इंफँटिनो यांच्याभोवतीचा वाद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बचावासाठी थेट मैदानात उडी घेतली आहे. इंफँटिनो यांना पदावरून हटविण्याचा विचारही करणे ही ‘भयंकर चूक’ ठरेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ‘फिफा’च्या विश्वचषक स्पर्धेतील काही भाग खासगी गुंतवणूकदारांना देण्याच्या योजनेवरून इंफँटिनो यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच ट्रम्प यांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
‘‘कोणत्याही कारणामुळे ‘फिफा’ने अध्यक्ष जियानी इंफँटिनो यांना हटविण्याचा विचार केला, तर ती भयंकर चूक ठरेल,’’ असे ट्रम्प यांनी ‘टथ सोशल’वरील पोस्टमध्ये म्हटले. इंफँटिनो यांचे कौतुक करताना त्यांनी त्यांना ‘उत्पृष्ट’ अध्यक्ष संबोधले. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी विश्वचषक झाला असून इंफँटिनो पदावर नसतील तर भविष्यातील विश्वचषक तितका यशस्वी किंवा फायदेशीर ठरणार नाही, असा दावाही ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प यांची ही भूमिका अमेरिकन
फुटबॉल महासंघाच्या भूमिकेशी मात्र विसंगत आहे. ‘फिफा’च्या खासगी गुंतवणूक योजनेला विरोध करणाऱया संघटनांमध्ये अमेरिकन फुटबॉल महासंघाचाही समावेश आहे.
चौथ्या टर्मसाठी इंफँटिनोंची वाट बिकट?
56 वर्षीय इंफँटिनो हे गेल्या दहा वर्षांपासून फिफाचे अध्यक्ष आहेत. मार्च 2027मध्ये होणाऱया फिफा काँग्रेसमध्ये ते चौथ्या आणि अंतिम कार्यकाळासाठी निवडणूक लढविणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर आहे. यापूर्वी त्यांच्या चौथ्या कार्यकाळाचा मार्ग जवळपास निर्विघ्न मानला जात होता. अमेरिका, मेक्सिको आणि पॅनडा येथे झालेल्या 48 संघांच्या सर्वांत मोठय़ा विश्वचषकाच्या यशानंतर त्यांची पकड आणखी मजबूत झाल्याचे मानले जात होते. मात्र खासगी गुंतवणुकीच्या योजनेने समीकरणच बदलले. ‘सीओएनसीएसीएएफ’चे अध्यक्ष व्हिक्टर माँटाग्लियानी हे इंफँटिनो यांच्यासमोर संभाव्य आव्हान म्हणून पाहिले जात आहेत. आफ्रिकन फुटबॉल महासंघाने इंफँटिनो यांना पाठिंबा दिला आहे. दक्षिण अमेरिकन महासंघ सीओएनएमईबीओएल ही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने असल्याचे सांगितले जाते. ‘फिफा’च्या अध्यक्षीय निवडणुकीत मात्र महासंघ नव्हे, तर प्रत्येक सदस्य संघटना मतदान करते. त्यामुळे इंफँटिनो यांच्यासाठी अंतिम लढत अद्याप खुली आहे.
विश्वचषक विक्रीच्या योजनेवरून वादाची ठिणगी
इंफँटिनो यांनी फिफाच्या विश्वचषकासह विविध स्पर्धांमध्ये खासगी गुंतवणूक आणण्याची योजना पुढे केली होती. मात्र या योजनेवर जगभरातून जोरदार टीका झाल्यानंतर अखेर त्यांना ती मागे घ्यावी लागली. युरोपियन फुटबॉल महासंघ अर्थात यूईएफए, उत्तर व मध्य अमेरिकेचा सीओएनसीएसीएएफ आणि आशियाई फुटबॉल महासंघ एएफसी यांनी इन्फँटिनो यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिन्ही महासंघांनी संयुक्त पत्राद्वारे इंफँटिनो यांच्यावर ‘‘फसवणुकीच्या माध्यमातून विश्वासाला तडा दिल्याचा’’ गंभीर आरोप केला. ‘‘फुटबॉलमधील नेतृत्व ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. सत्ता स्वतःकडे ठेवणे किंवा ती स्वतःकडेच राहावी अशी मागणी करणे, हे नेतृत्व नव्हे,’’ असा थेट टोला या महासंघांनी लगावला आहे.





























































