
आठ वर्षे सातत्याने मेडिक्लेम पॉलिसीचे हप्ते नियमित भरल्यानंतरही यावर्षी मात्र ज्येष्ठ नागरिकाला पुन्हा पॉलिसी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बजाज अलायन्झ विमा कंपनीला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने दणका दिला. इमानेइतबारे हप्ते भरणाऱ्या ग्राहकाला पॉलिसी का नाकारता याचे लेखी स्पष्टीकरण द्या, अन्यथा तत्काळ पॉलिसीचे नूतनीकरण करा, असा इशारा देताच बजाज अलायन्झ कंपनीचे प्रशासन नरमले आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या पॉलिसीचे पुन्हा नूतनीकरण करून दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मूळ ठाण्यात राहणारे व सध्या पुणे येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ नागरिक अरुण पेठे यांनी बजाज अलायन्झ विमा कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी घेतली. गेली आठ वर्षे त्यांनी सातत्याने त्याचे नियमित हप्ते भरले. गेल्या वर्षी अचानक पेठे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या बिलासाठी त्यांनी विमा कंपनीकडे क्लेम केला. तो कंपनीने पासही केला. त्यानंतर अरुण पेठे यांनी वार्षिक हप्ता भरून पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची विनंती कंपनीला केली.
अरुण पेठे व त्यांची पत्नी अमृता पेठे यांची गेली आठ वर्षे एकत्रित पॉलिसी होती. कंपनीने त्यांची पत्नी अमृता पेठे यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण केले. मात्र पेठे यांची पॉलिसी नूतनीकरण करण्यास टाळाटाळ केली. त्यांनी भरलेला विम्याचा हप्ताही कंपनीने कोणतीही सूचना न देता दोन-तीन टप्प्यांत पेठे यांच्या खात्यात परत केला. पेठे यांनी कंपनीचा एजंट व कंपनीकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्यांना दाद दिली जात नव्हती. त्यामुळे त्यांनी अखेर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अस्थायी समिती सदस्य अशोक शेंडे यांच्याशी संपर्क साधून कंपनीविरोधात लेखी तक्रार केली व न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
कंपनीने चूक मान्य केली
पेठे यांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कंपनीची चूक असल्याचे लक्षात येताच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची अस्थायी समिती सदस्य विजय मालणकर, अशोक शेंडे, निखील सावंत, देवदास माडये यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे नियोजित पदाधिकारी सुनील महाडिक, महेंद्र बिरवटकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील बजाज अलायन्झ विमा कंपनीच्या कार्यालयावर धडक देत त्यांना जाब विचारला. त्यानंतर तंतरलेल्या व्यवस्थापकांनी चूक झाल्याचे मान्य केले. पेठे यांच्या पॉलिसीचे तत्काळ नूतनीकरण करा आणि त्यासंबंधातील कार्यवाहीची माहिती लेखी स्वरुपात द्या, असे ग्राहक संरक्षण कक्षाच्या सदस्यांनी ठणकावल्यानंतर बजाज अलायन्झने तत्काळ पेठे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण केले. त्यानंतर तक्रारदार अरुण पेठे यांनी शिवसेना व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ग्राहकांच्या बाजूने नेहमी उभे राहून असाच न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपन्यांना न्यायालयात खेचणार
बजाज अलायन्झ, बजाज फायनान्स, सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या बँका आणि खासगी क्षेत्रातील फायनान्स कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीच्या अनेक तक्रारी ग्राहकांनी शिवसेना भवन येथे ग्राहक संरक्षण कक्षाकडे केल्या आहेत. त्या ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी इरडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेऊन दाद मागण्यात येईल, तर वेळप्रसंगी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करून दोषी विमा कंपन्यांविरोधात तत्काळ कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा इशारा ग्राहक संरक्षण कक्षाच्या अस्थायी समिती सदस्यांनी दिला आहे.



























































