धराली आणि हर्षिलमध्ये बचावकार्याचा 7 वा दिवस, 100 हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध अजूनही सुरूच

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल भागात (5 ऑगस्ट) ढगफुटी आणि अचानक आलेल्या, पुरानंतर सुरू झालेले बचावकार्य सातव्या दिवशीही सुरू आहे. काल रात्री सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धराली येथील ढिगाऱ्याचे दलदलीत रूपांतर झाले आहे. मुखवा ते धराली यांना जोडणाऱ्या पादचाऱ्यांच्या पुलाला भेगा पडल्याने मदतकार्यात एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हायटेक मशीन वापरून त्यांचा शोध घेतला जात आहे.

लष्कराचे पॅरा ब्रिगेड हर्षिलमधील जलाशयाच्या वर असलेल्या स्पीड बोटद्वारे नदीवर तात्पुरता मार्ग तयार करण्याची तयारी करत आहे. एनडीआरएफचा माउंटेनियरिंग डिव्हिजन पूर आलेल्या डोंगरावर पोहोचेल. याशिवाय, पॅरा ब्रिगेड हर्षिल आर्मी कॅम्पच्या पुढे एक रोपवे बांधण्याची योजना आखत आहे, जेणेकरून मदत आणि साहित्य पोहोचवणे सोपे होईल.

10 ऑगस्टपर्यंतच्या अपडेटनुसार, आतापर्यंत 1 हजार 308 लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. लष्कराच्या ताज्या अपडेटनुसार, 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी लष्कराने 2 ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (GPR) बसवले आहेत. तर राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेने 5 अतिरिक्त GPR तैनात केले आहेत. लष्कराच्या चीता हेलिकॉप्टरने LiDAR सर्वेक्षण केले आणि संपूर्ण बाधित क्षेत्राचे उच्च-तपशीलाने स्कॅन केले. तसेच जमिनीवर शोध घेण्यासाठी 10 स्निफर डॉग देखील तैनात करण्यात आले आहेत.