
उत्तरकाशीतील धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर पूर आला. या पुरात गावातील घरे, इमारती वाहून गेले. अनेक नागरिक बेपत्ता झाले. गेल्या पाच दिवसांपासून धारली, हर्षिल भागात बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 629 लोकांना वाचवण्यात आले आहे. बचाव कार्य एक ते दोन दिवसांत पूर्ण होईल.
केंद्र आणि राज्य सरकारी संस्था बाधितांना मदत करण्यात तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात आणि मूलभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांचे बचाव कार्य सुरू आहे.
मी धारली येथील ग्राउंड झिरोला भेट दिली. आरोग्य विभागाने छावण्या उभारल्या आहेत. मी उत्तरकाशीतील जिल्हा रुग्णालयालाही भेट देणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार, आरोग्य विभाग, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याच्या पथके एकत्र काम करत आहेत, असे उत्तराखंडचे आरोग्य सचिव आर. राजेश कुमार यांनी सांगितले.
धारली येथील डॉक्टर आपत्तीत जखमींवर उपचार करत आहेत. याशिवाय 28 रुग्णवाहिका आणि बॅकअप रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. 15 पैकी चार रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. बचाव कार्य एक ते दोन दिवसांत पूर्ण होईल, असे राजेश कुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रातील यात्रेकरूंनी सैन्य आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. प्रत्येक बाधित कुटुंबाला तात्काळ मदत म्हणून 5000 रुपये देण्यात आले आहेत. नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि आवश्यक ती मदत लवकरच जारी केली जाईल, असे उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितले. दरम्यान, धारली आपत्तीबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महानिर्देशक दीपम सेठ यांनी दिले आहेत.