कामगार, परिचारिका, जन्म नोंदणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवा, म्युनिसिपल कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामगार, परिचारिका, जन्म नोंदणी कर्मचारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने संबंधित कर्मचारी अडचणीत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.

कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपायुक्त कुऱहाडे, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्यासह सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल यांनी प्रत्यक्ष बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत तत्त्वतः मान्यताही देण्यात आली, मात्र पालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे म्युनिसिपल कामगार सेनेने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांना पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मागण्या

  • जन्म नोंदणी कारकुनांना कामाचे स्वरूप व पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे ‘क’ संवर्गात सामावून घ्यावे.
  • डीआरके, बीआरके संवर्गातील सर्व रिक्त जागा भराव्यात.
  • फार्मासिस्ट आणि टेक्निशियन्स संवर्गातील रिक्त पदे भरावीत.
  • परिसेविका, स्वच्छता निरीक्षक यांच्या मनमानी केलेल्या बदल्यांबाबत धोरण निश्चित करावे.
  • पदोन्नतीच्या कोटय़ातील पदे भरण्याची कार्यवाही करावी.
  • क्षयरोग नियंत्रण विभागात कार्यरत कामगारांना ओळखपत्र, सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे.