
लहान मुले ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. काही गेममुळे मुलांनी आत्महत्याही केल्याचे उघड झाले असून काहींनी आई-वडिलांचे बँक खाते रिकामे केल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. याच ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या एका मुलाच्या वडिलांनी तब्बल 39 लाखांचा फटका बसला आहे. हा प्रकार समजताच वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला आहे.
माजी सैनिक कोतवाल सिंह हे आग्राच्या खंदोली भागामध्ये राहतात. त्यांचा मुलगा नववीमध्ये शिकतो आणि त्याने ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात तीन महिन्यात वडिलांचे बँक खाते मोकळे केले. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये हा प्रकार घडला. दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून 21 लाख आणि 18 लाख अशी 39 लाखांची रक्कम अचानक कमी झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
अचानक खात्यातून जवळपास 40 लाखांची रक्कम गायब झाल्याने सिंह यांनी सायबर रेंजमध्ये अर्ज केला होता. फसवणूक करून खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कलम 420, 120 बी, 34 आणि 66 डी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच एवढी मोठी रक्कम अचानक कशी गायब झाले हे जाणण्यासाठी त्यांनी बँकेशीही संपर्क साधला. ही रक्कम पेटीएमवरून कोडा पेमेंटमध्ये गेली असून सिंगापूरच्या बँक खात्ताय ट्रान्सफर झाल्याचे बँकेने त्यांना सांगितले.
सिंह यांच्या खात्यातून रक्कम ज्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत ते खाते सिंगापूरमधील क्रॉफ्टन कंपनीच्या मालकीचे आहे. ही कंपनी बॅटल ग्राऊंडस मोबाईल इंडिया या नावाने ऑनलाईन गेम पुरवते. हिंदुस्थानमध्येही ही कंपनी लोकप्रिय असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, ऑनलाईन गेमच्या नादात बँक खाते मोकळे होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हरिपरवात परिसरातील एका व्यापाऱ्याच्या खात्यातून अचानक 30 लाख रुपये गायब झाले होते. त्यांच्या मुलाला ऑनलाईन गेमचे व्यसन होते आणि गेममध्ये पुढील स्टेजला जाण्यासाठी व गेममधील हत्यारं खरेदी करण्यासाठी हे पैसे मोजावे लागल्याचे उघड झाले.




























































