बेस्ट उपक्रमामध्ये पदोन्नतीवरून वाद, आर्थिक संकटात अधिकाऱ्यांवर पदोन्नतीची खैरात कशाला? देयकांच्या प्रतीक्षेत असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमातील निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असताना तसेच हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांची कोटय़वधीची देणी थकीत असताना अधिकाऱ्यांवर पदोन्नतीची खैरात कशाला केली आहे, असा संतप्त सवाल करीत बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने बेस्ट समितीच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बेस्ट समितीने उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवघ्या दहा दिवसांसाठी किंवा महिनाभरासाठी पदोन्नती देऊन बेस्टला आणखी आर्थिक संकटात लोटले आहे, असा दावा बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने केला आहे. समितीने यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पत्र लिहिले आहे. गेल्या महिन्यात नेताजी चौगुले यांना उपमहाव्यवस्थापक (विद्युत पुरवठा) तर ए.एस. राव यांना अभियांत्रिकी विभागाच्या उपमहाव्यवस्थापक पदी पदोन्नती देण्यात आली. तसेच रमेश मडावी यांना सहाय्यक महाव्यवस्थापक पदी पदोन्नती दिली आहे. फक्त दहा दिवस आणि एक महिन्याच्या कालावधीसाठी पदोन्नती मिळवून संबंधित अधिकारी काय काम करणार आहेत, असा सवाल महापौरांना लिहिलेल्या पत्रातून उपस्थित केला आहे. वाहतूक आणि अभियांत्रिकी विभाग बंद होण्याच्या मार्गावर आहे. बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ 249 बस शिल्लक राहिल्या आहेत, याकडे लक्ष वेधताना निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समितीने आपल्या ग्रॅच्युईटी तसेच इतर प्रलंबित देयकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

बेस्टच्या सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युईटी तसेच इतर देणींचा प्रश्न सुटेपर्यंत तसेच बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्टय़ा सक्षम होईपर्यंत अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊ नये, अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीतर्फे भाई पानवडीकर, भिमाजी गायकवाड व मनोहर जुन्नरे यांनी दिला आहे.