
जे.डी पराडकर । संगमेश्वर
स्वतः पोलीस असल्याचे भासवत एका साखर कारखान्याची रक्कम जाणाऱ्या गाडीला अडवून साडेचार कोटी रूपयांची रक्कम लंपास करून पळालेल्या गाडीला संगमेश्वर तालुक्यात पकडण्यात देवरूख आणि संगमेश्वर पोलिसांना यश आले. गाडीतील साडेचार कोटी रूपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली असून तिघांना अटक करून गाडी जप्त करण्यात आली आहे.
संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक मधील माजी डीवायएसपी अपहरण (नाव समजले नाही) करून आरोपी पुणे-बेंगलोर मार्गाजवळ कराड येथे उभे होते. ज्ञानयोगी शिवकुमार शुगर कारखाना विजापुरची साडेचार कोटी रूपये रक्कम घेऊन एक गाडी त्यांच्या कर्मचार्यांसह पुण्याकडे निघाली होती. आरोपींनी कराडमधील एका हॉटेलजवळ ही गाडी थांबवून अपहरण केलेल्या डीवायएसपीच्या सहाय्याने आपण पोलीस असल्याचे भासवत ही रक्कम संशयास्पद असून पोलीस स्टेशनला चला तिथे काय तो फैसला करून असे सांगत त्या गाडीतील साडेचार कोटी रूपयांच्या ३ बॅगा आपल्या ताब्यात घेतल्या. याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी याबाबत गृह विभागाशी संपर्क साधत संपूर्ण राज्यात नाकाबंदी केली. यानंतर रकमेसह पळालेल्या हुंडाई गाडीचा क्रमांक एम. एच. ४८ – एफ – २०५६ हा क्रमांक सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आला. यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी संपूर्ण जिल्ह्यात नाका बंदीचे आदेश दिले. त्यानुसार संगमेश्वर, साखरपा, देवरूख परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
सदरचे आरोपी ही गाडी घेऊन कराड कोकरूड मार्गे मलकापुर आंबा घाटातून कोकणात आल्याचे समजल्यावर देवरूख आणि संगमेश्वर पोलिसांनी सर्वत्र कडक नाकाबंदी केली. सदरची गाडी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोळंबे ताम्हाने कोसुंब मार्गे संगमेश्वरला येत असताना देवरूख आणि संगमेश्वर पोलिसांनी तिचा पाठलाग केला. यात संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गाडी अडवून ताब्यात घेण्यात आली. या गाडीतून गजानन महादेव अदडीकर (४५ बदलापुर,) महेश कृष्णा भांडारकर (५३, घोडबंदर ठाणे) चालक विकास कुमार मिश्रा (३०, जोगेश्वरी मुंबई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीतून रोख रकमेच्या तिनही बॅगा हस्तगत करण्यात आल्या असून रक्कम मोजण्याचे काम सुरू आहे.




























































