
सामना ऑनलाईन । अलाहाबाद
उत्तर प्रदेशमधील गुंडगिरीचा एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. येथे एका निवृत्त दरोगाची भर रस्त्यात लाकडी दांडक्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून एका 70 वर्षीय अब्दुल समद या वृद्धावर आरोपींनी 90 सेकंदामध्ये तब्बल 49 वार केले आहेत. ही घटना जवळच्या सीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील एका आरोपीला अटक केली आहे.
अब्दुल समद हे उत्तर प्रदेश पोलीसमध्ये कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते अलाहाबाद येथील शिवकुटु परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहात होते. त्यांच्या घराशेजारी हिस्ट्रीशीटर जुनैद यांचे घर आहे. दोघांमध्ये एका जमिनीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. याचा कारणाने दोघांमध्ये काहीवेळी बाचाबाची देखील झाली होती. सोमवारी अब्दुल काही कामानिमित्त सायकल घेऊन घराबाहेर पडल्यानंतर दबा धरून बसलेल्या गुंडांनी त्याच्यावर लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला. गुंडांनी केलेल्या हल्ल्यात अब्दुल हे रक्तभंबाळ झाले. विशेष म्हणजे हा हल्ला झाल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या कोणीही त्यांना वाचण्याचा प्रयत्न केला नाही. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे. या हल्ल्यानंतर गुंड त्यांना बेशुद्धावस्थेत सोडून पळाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अब्दुल यांना रुग्णालयात भरती केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आरोपींना अटक कधी – हायकोर्ट
सोमवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी हायकोर्टाने पोलीस प्रशासनाला फटकारले आहे. निवृत्त दरोगाची हत्या करणारे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपी स्पष्ट दिसत असूनही अद्याप त्यांना अटक का करण्यात आली नाही? असा सवाल हायकोर्टाने पोलिसांनी विचारला आहे. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींपैकी एक मोहम्मद यूसुफ याला अटक केली आहे.

























































