
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड नगरपालिकेत कर अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सायन्ना गंगाराम बत्तीन व त्यांच्या पत्नीस चौथे जिल्हा न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमवली म्हणून सायन्ना बत्तीन यांना ४ वर्ष सक्तमजुरी व १८ लाख रुपये दंड तर त्यांच्या पत्नी विठाबाई बत्तीनला १ वर्षे साधी कैद आणि २५ हजार रूपये रोख दंड तसेच गवळीपूरा येथील त्यांचे एक घर शासनाच्या स्वाधीन केले आहे.
दि. २४ फेब्रुवारी १९९३ रोजी गवळीपूरा अर्थात सायन्ना गंगाराम बत्तीन यांच्या घराशेजारी राहणाऱ्या अखिल खान नावाच्या व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगरकडे सायन्ना बत्तीनने आपल्या सेवा काळात भरपूर अपसंपदा जमवल्याचा अर्ज पाठवला होता. यावर संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड युनिटकडे तो अर्ज पाठवून त्याची गुप्त चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक गोपीनाथ पाटील यांनी गुप्त चौकशी पूर्ण करून उघड चौकशी करण्याची गरज असल्याचा अहवाल पाठवला आणि ती परवानगी मिळाली. त्यानुसार सायन्ना गंगाराम बत्तीन यांच्या अपसंपत्तीची उघड चौकशी सुरू झाली.
सायन्ना बत्तीन हे मुळ नवीपेठ ता. जि. निजामबाद येथील रहिवाशी आहेत. दोन वर्षाचे वय असताना ते आपल्या मावशीकडे नांदेडला दत्तक पुत्र झाले. त्यांचे शिक्षण कला शाखेत पदवी पर्यंत झाले. ५ जून १९६४ रोजी नांदेड नगरपालिकेत ते कारकून या पदावर रूजू झाले. १९७६ मध्ये त्यांना भांडारपाल पदावर पदोन्नती मिळाली. पुढे १९९६ मध्ये सायन्ना बत्तीन जकात अधीक्षक झाले आणि ३० नोव्हेंबर १९९८ ला सेवानिवृत्त झाले. सायन्ना बत्तीन यांनी आपले दुसरे लग्न विठाबाई सोबत केले. उघड चौकशी झाली तेव्हा सायन्ना गंगाराम बत्तीन आणि त्यांची पत्नी आणि ६ अपत्याच्या नावावरच्या संपत्तीची चौकशी झाली तेव्हा त्यांचे एकूण उत्पन्न २४ लाख ३६ हजार ५५३ रूपये ८० पैसे होते. या पैशांतून त्यांचा खर्च वजा करण्यात आला तो १८ लाख ९४ हजार ०८० रूपये ३० पैसे होता. त्यातून शिल्लक राहिली. ५ लाख ४२ हजार ४७३ रूपये ५० पैसे. एकूण मालमत्ता १२ लाख ३४ हजार ११९ रूपये ५४ पैसे एवढी होती. त्यामुळे या सर्व बेरीज आणि वजाबाकीतून रक्कम उरली ती ६ लाख ९१ हजार ६४६ रूपये ४ पैसे एवढी अपसंपदा होती. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शंकरराव संगू यांनी अशी अपसंपदा असल्याची तक्रार दिली आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सायन्ना गंगाराम बत्तीन आणि त्यांची पत्नी विठाबाई सायन्ना बत्तीन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक माणिक पेरके यांनी सन २००१ मध्ये बत्तीन पती-पत्नीविरूद्ध न्यायालयात ३१४ साक्षीदारांच्या यादीसह दाखल केलेल्या दोषारोप पत्रात बत्तीन पती-पत्नीच्या नावावर एकूण १९ लाख ४६ हजार ७३६ रूपये १५ पैसे एवढी अपसंपदा असल्याचे लिहिलेले होते. यानंतर सन २०१६ पर्यंत बत्तीन पती-पत्नीने आपल्याकडे असलेली संपत्ती कशी खरी आहे हे दाखवण्याचे अनेक कागदपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाच्या प्रक्रियेत सरकार पक्षाच्या वतीने २१ साक्षीदार तपासण्यात आले आणि सायन्ना बत्तीन यांच्यावतीने सुद्धा पाच बचावाचे साक्षीदार तपासण्यात आले, अशी माहिती सहायक सरकारी वकील अॅड. रणजित देशमुख यांनी दिली.
१२ ऑक्टोबर रोजी चौथे जिल्हा न्या. हरीभाऊ वाघमारे यांनी सायन्ना गंगाराम गौड (बत्तीन) आणि त्यांची पत्नी विठाबाई सायन्ना गौड (बत्तीन) या दोघांना अपसंपदा जमवल्यासाठी दोषी जाहीर केले. यात सायन्ना गंगाराम गौड (बत्तीन) यांना ४ वर्षे सक्तमजुरी १८ लाख रूपये दंड आणि दंड न भरल्यास जास्तीची सक्तीमजुरी अशी शिक्षा ठोठावली. विठाबाई सायन्ना गौड (बत्तीन) यांना एक वर्षे साधी कैद आणि २५ हजार रूपये रोख दंड ठोठावण्यात आला. गवळीपूरा येथील त्यांचे घर ज्याचा मनपा क्र. ३-२-२५२ आहे हे घर सरकारच्या संपत्तीत जमा करण्याचे आदेश न्या. हरीभाऊ वाघमारे यांनी दिली असल्याची माहिती अॅड. रणजित देशमुख यांनी दिली.































































