
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
स्मार्ट फोनवर केलेल्या एका क्लिकसरशी घरबसल्या हवी ती वस्तू खरेदी करता येऊ शकेल याचा आपण कधी स्वप्नात तरी विचार केला होता का? अर्थातच नाही, पण द्रष्टय़ा जेफने हेच स्वप्न उराशी बाळगून 1994 मध्ये ई-कॉमर्स व्यवसायात पदार्पण केलं. त्यावेळी वार्षिक 2300 टक्क्यांहून अधिक वेगाने वाढणारे इंटरनेट हेच जगाचं भविष्य असणार आहे हे अचूक ओळखणारा जेफ जेमतेम पंचवीस वर्षांत पृथ्वीतलावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला. त्याच्या कंपनीचे नाव आहे ‘अॅमेझॉन.’ अनेक देशांच्या घनदाट, निबीड, गूढ जंगलातून वाहणारी जगातील ही महाप्रचंड नदी. अॅमेझॉन म्हणजे महाकाय, अतिप्रचंड किंवा जायजँटिक! जेफला आपला धंदा असाच महाकाय स्तरावर न्यायचा होता म्हणून त्याने कंपनीसाठी नाव निवडलं ‘अॅमेझॉन’ आणि अवघ्या अडीचतीन दशकांत ही कंपनी जगातील एक महाकाय कंपनी बनली. जगातील सर्वात जास्त नोकऱ्या देणारी कंपनी ठरली.
‘अॅमेझॉन’च्या झंझावाती वाटचालीची कहाणी सांगणारं हे पुस्तक सिद्धहस्त उद्योजकीय चरित्रलेखक सुधीर सेवेकर यांनी तितक्याच रोमहर्षक पद्धतीने लिहिलेले आहे. पुस्तकाच्या चौदा प्रकरणांतून ‘अॅमेझॉन’सह त्यांनी जेफ बेझोसच्या नाटय़पूर्ण जीवनाचाही अचूक वेध घेतलेला आहे. पुस्तकात आठ परिशिष्टे आणि सुमारे चाळीसएक छायाचित्रे आहेत. त्यामुळे पुस्तकाची वाचनीयता आणि सौंदर्य दोन्हीही खुललेले आहे.
जेफने केवळ ऑनलाइन महाकाय ‘अॅमेझॉन’ दुकान काढले असे नाही, तर करमणूक उद्योग, रोबोटिक्स अर्थात यंत्रमानवशास्त्र, क्लाऊड कॉम्प्युटिंग, अंतरिक्ष संशोधन, संरक्षणशास्त्र उत्पादने अशा विविध क्षेत्रांत संशोधनातून अक्षरशः चकीत करतील अशी नानाविध उत्पादनेही विकसित केली. ‘सिंडल’ हे त्याचे एक छोटे उदाहरण. आता जेफला परग्रहावर पृथ्वीतलावरील प्रदूषण वाढविणारे उद्योगधंदे, कारखाने हलवून पृथ्वीला सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याचा ध्यास लागलेला आहे. जेफच्या अफाट यशाचा धांडोळा जसा पुस्तकात घेतलाय, तसाच त्याच्यावरील आरोप-प्रत्यारोप, कोर्ट केसेस, वादविवाद यांचाही परामर्श लेखक सुधीर सेवेकर यांनी घेऊन पुस्तकास अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाची भाषा विलक्षण ओघवती आहे. अनेक तंत्रशास्त्रीय संकल्पना सोप्या भाषेत मांडल्या आहेत. मांडणी, संजावट यावरही ‘साकेत’ प्रकाशनाच्या टीमने सृजनशीलता दाखवलेली आहे. जेफ बेझोस आणि अॅमेझॉन यांवरचे हे मराठीतील तरी पहिलेच पुस्तक ठरावे. सर्व थरांतील वाचकांना ते वाचायला नक्की आवडेल!
अॅमेझॉन
लेखक : सुधीर सेवेकर
प्रकाशक : साकेत प्रकाशन, पुणे-संभाजीनगर
पृष्ठ : 232, मूल्य: रुपये 250/-





























































