परीक्षण – ऐतिहासिक कुलवृत्तांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सदानंद खोपकर

आपण कोण कुठले, आपलं मूळ कुठल्या मुलखातले, वंशवृक्षाचा प्रवास मूळ पुरुषापासून आपल्या पिढीपर्यंत कसा झाला, याचा शोध घेण्याचा ध्यास काही जण घेतात. अथक परिश्रम करून सातत्य व चिकाटीने तो पूर्ण करतात. ही बाब खरी मानली तर ‘रावराणे इनामदार कुलवृत्तांत’ संशोधन करण्यात पत्रकार ज्ञानेश्वर रावराणे हे यशस्वी ठरले आहेत. साऱया देशाला ललामभूत अशा राजघराण्यातील एका शाखेच्या ऐतिहासिक कुलवृत्तांताचा हा परिचय…

आज कोकणातील सिंधुदुर्ग जिह्यात वैभववाडी तालुक्यातील येडगावातील रावराणे इनामदार कुटुंबातील ज्ञानेश्वर रावराणे हे ‘रत्नागिरी टाइम्स’ या वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

आपल्या गाव-मुलखावर तसेच आपल्या चितोड राणा प्रतापसिंह यांच्या वंशातील असल्याचा प्रचंड अभिमान. त्यातूनच त्यांनी संकल्प केला व बाप्पा रावळपासून थेट दक्षिणेत आलेल्या पूर्वज क्षेमसिंगपर्यंत व तिथून थेट आजच्या पिढीपर्यंतचा इतिहास शोधून काढला. प्रचंड परिश्रम व खाटाटोपानंतर जवळपास चारशे पानांचा संशोधपर ग्रंथ ‘रावराणे इनामदार कुलवृत्तांत’ सिद्ध झाला. हा ग्रंथ राजस्थानातील उदयुर या वंशाची वंशावळी व तेथील रोमहर्षक इतिहास कथन करतो. तलवार हेच ‘ब्रीद’ मानणाऱया कुळातील ही मंडळी दक्षिणेत आल्यानंतरही थेट इंग्रज अंमल सुरू होईतोवर प्रत्येक राजवटीत समशेरीचे पाणी दाखवत पराक्रमाने तळपत राहिली हे सांगतो. राज्यभरातील राणे, गोव्यातील सत्तरीचे राणे, शृंगापूरचे राजे सुर्वे व कोल्हापूरकर व कोकणात स्थिरावलेले खानविलकर हे सारे एकाच रावराणे मूळ कुटुंबातील असून चितोडच्या राणा घराण्याशी संबंधित आहेत ही माहिती मिळते. हा अभिमान व हे शब्द या प्रदीर्घ पुस्तकात वारंवार येतात ते त्यामुळेच. मुखपृष्ठावरील रावराणे कुलाची शस्त्र – ध्वज व शिरस्त्राण ही त्यांच्या लढवय्या बिजाचे प्रत्यंतर देतात, पण ‘अरीमर्दना गोब्राह्मण गुरूजनानंददायक स्वकुलाकाशे चंद्रव शोभयामना’ हे संस्कृत ब्रीदवाक्य ते ठळकपणे व्यक्त करते.

चितोडहून राणा सज्जनसिंह व राणा क्षेमसिंह हे बंधू आपल्या फौज कुटुंब काबिल्यासह दक्षिणेत आले. त्यापैकी क्षेमसिंह यांचे वंशज म्हणजे रावराणे आणि सज्जनसिंह यांच्या वंशातच छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा जन्म झाला. हे आपले महापुरुष असे रावराणे मानतात व ते या पुस्तकात पानोपानी नमूद आहे. इ.स. 1306 पासूनचा चितोडचा व राणा घराण्याचा पुढील वंशावळीचा इतिहास समजून येतो.

इ.स. 1158 मधील करणसिंह रावळपासून सज्जन सिंह व क्षेमसिंह (दक्षिणेत आलेले) यांची वंशावळ या पुस्तकात आहेच, पण पिता राणा अजयसिंह यांनी वारस म्हणून आपला पुतण्या राणा हमीर यांना निवडल्यामुळे हे बंधू चितोड सोडून दक्षिणेत आले. (इ.स. 1320) साली ही माहिती मिळते. या पुस्तकातील प्रदीर्घ वंशावळी हा कितिकांच्या आनंदाचा विषय ठरेल, परंतु छत्रपतींनी स्वराज्याच्या अमात्यांनी दिलेल्या सनदा, आज्ञापत्रे, दस्तावेज यांच्या वाचनातून रावराणे घराण्यातील पुरुषांची आपल्या स्वामी विषयाची निष्ठा दिसून येते. रावराणे इनामदार हे पराक्रमी, स्वाभिमानी, विश्वासू व इमानी आहेत असे दस्तुरखुद्द श्रीमंत अमात्यांनीच म्हटले असून शेणव्यांच्या फौजांचा खात्मा केला म्हणून दिलेले बहुमान पत्र (1805) याच पुस्तकात वाचायला मिळते. कुळातील कित्येक प्राचीन कर्तबगार पुरुषांची नावे आढळतातच, पण बारा गावांत स्थायिक रावराणे सरपंचांची नावे वाचावयास मिळतात. वैभववाडी तालुक्यात उभे असलेले भव्य अर्जुन रावराणे विद्यालय व आनंदीबाई रावराणे महाविद्यालय ही या कुळाची आजवर जपलेली सामाजिक बांधिलकी दाखविते.

एडगावातील सुबोध पुंडलिक रावराणे यांनी चितारलेले ढाल-तलवारीचे अप्रतिम मुखपृष्ठ, उत्कृष्ट छपाई, मेवाड राणा घराण्याचे प्रतीक चिन्हे, चितोडमधील ऐतिहासिक वास्तूंची छायाचित्रे तसेच महाराष्ट्रात स्थायिक झाल्याने नंतरच्या अनेक गावांतील येथील वास्तू, मंदिरे तसेच चितोडवर राणी पद्मिनीसहित हजारो स्त्रियांनी जोहर केला ते स्थल आणि दक्षिणेत आल्यावर रावराणे घराण्यातील सती गेलेल्या कुल स्त्रियांची सती स्थळे यांची छायाचित्रे येथे पाहायला मिळतात. घराण्यातील अनेक पराक्रमी व्यक्तींनी केलेल्या लढाया व राज्य रक्षणाचे कार्य व शिक्षणाचे कार्य ही याच निष्काम परंपरेची फलश्रुती आहे. म्हणून रावराणे इनामदार कुलवृत्तांत हा या समाजासाठी ‘ज्ञानेश्वरी’ ठरली असून हे पुस्तक वाचनीय आहेच, पण अनेकांना आपला कुलवृत्तांत लिहिण्यास प्रेरणा देणारे ठरेल यात शंका नाही.

रावराणे इनामदार कुलवृत्तांत
लेखक : ज्ञानेश्वर रावराणे
प्रकाशक: खोरकर अरुळेकर रावराणे मंडळ व कुलवृत्तांत समिती