
>>उमेश मोहिते
मराठवाडय़ातील आजच्या पिढीच्या तरुण लेखिका-कवयित्रींमध्ये ज्योती सोनवणे हे एक महत्त्वाचं नाव. त्यांचा ‘दमकोंडी’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. एकूण पंधरा कथा असलेल्या या संग्रहातील एखाद्या कथेचा अपवाद वगळता सर्वच कथा स्त्री भावविश्वकेंद्री असून या स्त्रिया मुख्यतः कष्टकरी, गरीब गावखेडय़ातील महिला आहेत. त्यांची सुख-दुःखे, हर्ष-विमर्श, त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण, सातत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक आणि रुढी, प्रथा व परंपरांमध्ये होणारी त्यांची घुसमट या कथांमधून सामर्थ्याने उजागर झाली आहे. आयुष्यभर सखानानाकडून सततची अवहेलना झालेली वृद्ध तुळसाबाई आत्मनिर्भर होऊन मुलगा भावडय़ा व पती सखानानाच्या विरुद्ध बंड करून त्यांना कशी वठणीवर आणते आणि पंढरपूरला आषाढी वारीला जाते हे ‘डाव’ कथेत छान रंगवले आहे. कानातले सोन्याचे फुलं घरच्यांना चोरून केलेल्या सगुणाची फुलं अंधारात चोर चोरून नेतो तेव्हा ती भुतानं झपाटल्याचं ढोंग करते, मात्र स्वतःचा दागिना चोरीला गेल्याचं सर्वांपासून लपवते, अशा आशयाची ‘भूत’ ही कथा ग्रामीण भागातील सासूरवाशिणीचं दुःख नेमकेपणाने टिपते. खेडय़ातील जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शीतलबरोबर गावी आलेली आधुनिक विचारांची वेदिका शीतलच्या आईच्या मनात आत्मभान कसं जागृत करते आणि त्यांना स्वतःच्या पतीविरुद्ध उभे राहण्यास प्रवृत्त करते, याचा प्रत्यय ‘चिंगारी’ कथेत येतो. ही कथा वर्तमान राजकारणातील स्त्रियांच्या नाममात्र सहभागावर मार्मिक रीतीने भाष्य करते. पंढरीच्या वारीला जाण्याचे कितीक वर्षांचे स्वप्न पूर्ण होते आहे म्हणून खूश असलेल्या ठकूबाईच्या नवऱ्याला ती पंढरीच्या वारीला निघता वेळेसच साप चावतो, तेव्हा पांडुरंगावर संतापलेल्या ठकूबाईचा ‘निर्धार’ कथेतील दृढ निश्चय वाचक मन सुखावून जातो. पवळ्या नावाच्या म्हाताऱ्या बैलाला खाटकाला विकण्यासाठी इरेला पेटलेला सदा आणि पवळ्यासाठी जीव टाकणारा म्हातारा राघूतात्या यांच्यातील नाजूक व संवेदनशील संघर्षाचे नाटय़ ‘पवळ्या’ या कथेत असून ही अप्रतिम कथा दोन पिढय़ांतील आचार-विचारांतील संघर्ष नेमकेपणाने टिपते, तर एका मुलाची आई असलेल्या विधवा शेवंताच्या प्रेमात पडलेल्या आधुनिक विचारांच्या संतोषची प्रेमकहाणी ‘वचन’ या कथेत आहे.
लेखिका ज्योती सोनवणे लिखित ‘दमकोंडी’ हा कथासंग्रह गावखेडे व शहरातील गरीब कष्टकरी स्त्रियांच्या मानसिक व शारीरिक घुसमटीचा सर्वांगीण वेध घेणारा असून ही कथा ओघवती लेखनशैली, नेटके संवाद, ठसठशीत पात्रचित्रण व चित्रमय शैलीमुळे मनाला स्पर्शून जाते, पण याचा अर्थ ही कथा केवळ स्त्रियांच्या घुसमटीचे व दमकाsंडीचेच फक्त चित्रण करते असा नाही, तर या कथेतून पुरुषसत्ताक समाजरचनेतून स्त्रियांच्या मुक्ततेच्या वाटांचे सूचन होऊन ही कथा स्त्रियांना संघर्षासाठी सिद्धही करते हे विशेष! ‘दमकाsंडी’मधील कथा वर्तमानकालीन गरीब कष्टकरी वर्गातील स्त्राr जीवनाची स्थिती-गती समर्थपणे अधोरेखित करणारी आहे.
‘दमकोंडी’ – (कथासंग्रह)
लेखिका – ज्योती सोनवणे
प्रकाशक- तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी
पृष्ठे – 141, मूल्य- रुपये 250/-





























































