परीक्षण : ‘काजवा’च्या प्रकाशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भिकू बारस्कर

चमचमणारे काजवे मनाला भुरळच घालत असतात. काळ्याकुट्ट अंधारात चाचपडत असताना, आता काय? असा प्रश्न पडलेला असतानाच समोर अचानक ‘काजवा’ चमकावा तसाच काहीसा प्रकार ज्येष्ठ कवी नारायण लाळे यांचा तीन दशकांनंतर प्रकाशित झालेला ‘काजवा’ हा कथासंग्रह वाचल्यानंतर झाला. नेहमीच्या साचेबद्ध कथा वाचताना वाचक नव्याचा सतत शोध घेत असतो आणि असा शोध घेताना अचानक नारायण लाळेंच्या रूपाने काजवा चमकावा तसे झाले. नारायण लाळे हे प्रसिद्ध कवी असून उत्तम लेखक आहेत.

‘काजवा’ या कथासंग्रहातील पहिली कथा ‘दृष्टी’ हीच मनात घर करून जाते. गमतीगमतीमध्ये बायकोबरोबर झालेला संवाद तिच्याच आग्रहास्तव नेत्रदानासाठी भरून दिलेला फॉर्म आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्या नायकाचे या जगातून निघून जाणे, इच्छेनुसार नेत्रांचे दान करणे ही सारी घटना प्रत्यक्ष त्या मृत पावलेल्या नायकाच्या नेत्रातून वदवली आहे. सरतेशेवटी नेत्रदान हे किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे दुसऱया एका जिवंत माणसाला दृष्टी मिळून त्याने नव्याने हे जग बघितले. सुरुवातीची ही कथा मनाला हळुवार स्पर्श करते. शेवटी नेत्रदानाबद्दल वाचकाला विचार करायला लावते. एवढे सामर्थ्य या कथेमध्ये आहे.

नारायण लाळे यांच्या कथा माणसाला नकळत शिकवण देऊन जातात. कुठेही शब्दांचे अवडंबर न माजवता हलक्याफुलक्या कथेद्वारे समोर अस्तित्वात नसणाऱया माणसातीलच त्याचे मन व्यक्त करावे व अस्तित्वात असलेल्या माणसाला शिकवण देण्याचे कसब या कथांद्वारे दिसून येते. ‘आधार’ या कथेत विवाहितेचे मन, तिची तळमळ दिसते पण ‘तो’ तितकाच हतबल असल्याचेही दिसते. कुणी आपल्यावर प्रेम करावे आणि आपण आपल्यातील हतबलता ओळखून त्या प्रेमाला दुजोरा न दिल्यामुळे होणारे परिणाम समोर दिसतात.

‘गर्भ’या कथेत ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ हा डांगोरा पिटणारा समाज, मुलगी गर्भात असल्यापासून तिच्यावर होणारे अन्याय, अत्याचार हे त्या अर्भकाच्या तोंडून वदवण्यातील कल्पकता खूप काही सांगून जाते.

या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतील पात्रे ही अशीच नजरेआड राहून संवाद साधताना वाचकांच्या मनाचा ठाव घेत असतात. ‘करा रे हाकारा पिटा रे डांगोरा’ या कथेच्या नावाप्रमाणेच आजच्या इलेक्ट्रिक मीडियाचे दृश्य जग समाजाला दिसते. हा मीडिया डांगोरा पिटून आपले उखळ पांढरे करतो, पण त्यामागे जे सत्य दडलेलं असतं त्या सत्याची जाण त्यांना खूपच उशिरा येते. ती पत्रकार त्या भिकारी वस्तीची कथा बनवते, ती त्या चॅनेलवर दाखवली जाते. खूप वेळा दाखवली जाते. त्या चित्रफितीला उत्तम चित्रफित (बातमी) म्हणून तिला पारितोषिक मिळते, पण त्यामुळे त्या गरीब भिकाऱयाची रोजची कमाईच जाते. तो भुकेकंगाल होऊन ती जागाच सोडून जातो, हे बातमीमागचे सत्य तिला नंतर कळते. हा विषय आपल्या सर्वांच्या रोजच्या जीवनातील विषय आहे, पण तोच विषय लेखकाने कथारूपाने सुंदर गुंफण करून वाचकांसमोर मांडताना वृत्तपत्र स्वातंत्र्याचे सत्यच दाखविले आहे.

‘निरोप’ कथेद्वारे शाळेत शिकणाऱया मुलांचे मत व आई-बाबांचे त्यांच्याबरोबरच वागणे याचा प्रकाशझोत टाकत पालकांनी आपल्या पाल्याबरोबर कसे वागावे, नाहीतर भलतेच काही घडू शकते हे अलगदपणे लेखक नारायण लाळे यांनी सांगितले आहे. ‘वेडय़ांचा बाजार’ ही कथा म्हणजे आजच्या अंधश्रद्धा, लोकांमध्ये चाललेला अंधकारमय खेळच जणू. ते म्हणतात, ‘न दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.’ तसाच काहीसा प्रकार स्वतःहून वेडा झालेला तो. लोकांनी त्याला वेडाच केला आणि नंतर त्याच भोळ्याभाबडय़ा लोकांवर तो राज्य करू लागला. त्यावेळी तो वेडा म्हणतो ‘तुमचे भोळेपण हेच माझे भांडवल’, ‘तुमची अंधश्रद्धा हीच माझी दासी आहे.’ माझ्यासारखे अनेक वेडे भगव्या वस्त्रात प्रत्येक गावात ठाण मांडून बसलेत. तुम्हाला कुरतडत बसलेला तुमच्यातला विरोध षंढ बनत चाललाय या वाक्यांनी समाज जागृत करण्याचा लेखकाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. लाळे यांचा हा कथासंग्रह नुसता संसाराच्या चौकटीत अडकलेला तर नाहीच, पण प्रेमाचा त्रिकोणसुद्धा नाही. या कथा तुमच्याआमच्या आयुष्यात नेहमी घडत असतात आपण त्या पाहतो. काही प्रसंगी अनुभवानेही पण नेहमीच्या सवयीप्रमाणे विसरूनही जातो. ‘काजवा’ या कथासंग्रहात एकूण तेरा कथा आहेत. प्रत्येक कथा बोलकी असून वाचकांच्या मनाला स्पर्श करणारी आहे. या प्रत्येक कथेबद्दल खूप काही लिहिता येईल, बोलता येईल. त्यामधे वाचक आपले विचार करू शकतील तेव्हा त्या कथा वाचून त्याचा आनंद घेणे अधिक उचित ठरेल.

‘काजवा’ या कथासंग्रहाचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे, त्यातील संवादात्मक भाषा. या संवादरूपी फॉर्ममुळे त्यातील पात्रे वाचकांशी थेट संवाद साधत एकरूप होतात. मराठी कथेला समृद्ध परंपरा आहे. त्यात स्वतःचे स्थान हा संग्रह निश्चित निर्माण करील याची खात्री संग्रह वाचल्यावर येते. ‘गर्भ’ ही केवळ कथा नाही, तर त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. कमीत कमी शब्दांत आभाळाएवढा अर्थ प्रकट करण्याची ताकद कवींमध्ये असते. कवी जेव्हा कथा लिहितो तेव्हा त्याचे कवीपणही सोबत सतत असते. फक्त त्याची अभिव्यक्ती कथारूपी असते. चांगला कवीही चांगली कथा लिहू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ‘काजवा’ कथासंग्रह. तो वाचकांच्या मनाला सतत प्रकाश देत राहील.

काजवा
लेखक – नारायण लाळे
प्रकाशन – संवेदना प्रकाशन
पृष्ठ – 166, मूल्य – 200 रुपये