मनाचा धांडोळा घेणाऱ्या कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रघुनाथ सोनटक्के

आपण या जगाला स्वार्थी म्हणतो, मात्र समाजाचा आपणही भाग असतो, हेही खरंच! थोडय़ाफार प्रमाणात सारेच स्वार्थी असतात. कदाचित निसर्गनियमच बनून गेलाय हा. या गुणामुळे (मुळात अवगुणच!) माणसात काय विपरीत बदल होतात हे आपण बघतच असतो.

मनाला स्वार्थी बनवणारे कंगोरे पण किती असतात. कधी हे मन हेकेखोर, अहंकारी, असत्य, अविश्वासू असं बरंच काही बनतं. या स्वार्थी मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. माणसाला येथील ऐहिक सुखाचा, मायेचा मोह आवरता येत नाही. अगदी अंतापर्यंत तो त्याला कवटाळून बसतो. सोबत काहीएक येत नसूनही का बरं एवढा हव्यास करावा हा प्रश्नच आहे. सुज्ञ माणसाला हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. त्यासाठीच की काय यावर उपाय म्हणून ही स्वार्थी नाती माणुसकीने कशी जपता येतील यासाठी आपण प्रयत्न करायला हवा.

‘मन’ हा शब्द म्हटला की ती बहिणाबाईंची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. कधी मन फुलाचे कोंब होते तर त्याहूनही नाजूक पानावरील दवांचे मोतीरूप घेते. कधी लवचिक तर कधी कठोरही होते. त्याची ना खोली कळत ना व्याप्ती.

दुःख सहन करणे हे काही नवीन नाही. प्रत्येकाला त्याचा सोस सोसावाच लागतो. कुणाला थोडं सहन करावं लागतं, तर कुणाला निखाऱयावरून चालावं लागतं. रानातल्या भेसूर रात्रीने मनाचं फूल उन्मळून जातं आणि मन निर्माल्यागत होऊन जातं. मनाचा हा गुणधर्म भूतकाळच्या आठवणीने आणखीनच अक्राळविक्राळ होतो. अशाच विरक्ती आणि विरहाच्या जखमा भूतकाळात दडलेल्या असतात पण यातून मार्ग काढण्यासाठी मन धैर्य करतं.

एकंदरीतच या जगाच्या गर्दीत मनाचे चढउतार मनाचे सामर्थ्य सिद्ध करतात. नाहीतर हे आयुष्य कोडं बनून जाते. देविदास खडताळे यांचा ‘कंगोरे मनाचे’ हा कवितासंग्रह मनाचा धांडोळा घेण्यात खरा उतरला आहे. त्यांचं हे प्रकाशित झालेलं नववं पुस्तक आहे. याचा अर्थ त्यांचं साहित्यातील ‘व्याकरण’ चांगलंच बळकट आहे. प्रतिमा, प्रतीकांचा मनाच्या अवस्था रेखाटण्यासाठी त्यांनी पुरेपूर वापर केला आहे, हे त्याचं काव्य वाचल्यावर कळतेच. पुस्तक वाचायला घेतल्यावर सुरुवात मुखपृष्ठापासून होत असल्यामुळे पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठचित्र याचा संबंध लावला जातो. शिवाय पुस्तकाच्या आत काय ‘लिहून’ ठेवलंय याचाही अंदाज येतो. ‘मनाचे कंगोरे’ला समर्पक आणि थोडंस गहन वाटणारं मुखपृष्ठ लाभलं आहे. एकून चाळीस पानांच्या छोटेखानी अंकात 34 कविता असून जवळपास सर्व कविता मनाचे पैलू दर्शवतात.

पुस्तक वाचताना त्याचं रसग्रहण केल्यावर कवीचं किंवा लेखकाचं मन कळंत. त्यानुसारच हे पुस्तक मनाचे कंगोरे समजून घ्यायला खरं उतरलं आहे असं मला वाटतं. राहिला प्रश्न यातील त्रुटींचा. संग्रहाच्या नावाप्रमाणे विचार केला तर सर्व कविता एका विषयाला धरून असायला हव्यात, मात्र एक-दोन कविता विषयाशी फारकत घेणाऱया ठरतात. त्याऐवजी विषयाला धरून आणखी कवितांना संग्रहात जागा देता आली असती आणि पुस्तकाला प्रस्तावना घेता आली असती तर आणखी बरे झाले असते. मनात वसलेल्या आप्तेष्टांना समर्पित केलली अर्पणपत्रिका सारं काही सांगून जाते.

कंगोरे मनाचे
कवी – देविदास खडताळे
समीक्षण – रघुनाथ सोनटक्के
प्रकाशक – वैशाली प्रकाशन, पुणे
मूल्य – ७० रुपये