दुःखाचे भरजरी अस्तर…

>> अरविंद दोडे

पहिलाच कवितासंग्रह प्रकाशित व्हावा आणि प्रचंड प्रतिसाद मिळावा हा दुर्मिळ भाग्ययोग हेवा करावा असाच नवलाचा आहे. ‘निमित्तमात्र’ या संग्रहाचे कवी आहेत गीतेश शिंदे. ‘देवा असे कसे झाले/तुझे आभाळ वांझोटे/ढग रिताच फिरतो/अन् जीव घुसमटे’ ही दुष्काळी अवकळा व्यथित करताना दुसरीकडे कवीचा आशावाद आश्वासक असल्याचे दिसते. आशेच्या बळावर सकारात्मक भाव ओलावा निर्माण करतो अन् तोच जगण्यास प्रवृत्त करतो, परंतु एक प्रश्न हैराण करतो, ‘कोरडय़ा आभाळाची कोरडी कहाणी/आभाळाने कुणाकडे मागावं पाणी?’

ऊन-पावसाचा खेळ सुखदुःखाच्या ऋतुचक्रासारखाच असतो, परंतु भौतिक पातळीवर सत्य हे संवेदना नेमकेपणी व्यक्त करण्यास शब्द दुबळे ठरतात. तेव्हा त्या पलीकडील आधार शोधताना वास्तवाला स्वप्नांचा स्पर्श सहन होतो का? संवेदनांची तीक्रता वाढते, तेव्हा त्यांचे विघटन झालेले नसते. हा मूलस्रोत अंतरातील विश्वाच्या गूढतेचा मूळ गाभा असतो. त्यातूनच नवनिर्मितीशील सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक नात्यांची पुनर्रचना कवी करीत असतो. मात्र त्याची मानसिक रिक्तता भरून काढण्यासाठी तो आधार घेतो कवितेचा ‘इतकं रिकामं रिकामं/का वाटतंय/ तू असूनही माझ्यातच?/ की तू आहेस/हाही आभासच?’ अशा प्रश्नांनी मेंदू पिंजून निघतो. अशांतता कळस गाठते. दुसऱया नात्यांचे विश्लेषण करता येत नाही, हेच खरे! रंगांच्या आसक्तीला काळोखाचा डंख बसल्यावर फुलपाखरांच्या क्षणिक गंधवेडाची आठवण येणे अपरिहार्य असते. उमललेल्या फुलांचे निर्माल्य करायचे की अत्तर, या प्रश्नाचे उत्तर जिवाचे जिवलग देत नाहीत, हा सल कायम राहतो. ‘वटवृक्ष होईल असं वाटत असतानाच/बोन्सायचंही लाभले नाही भाग्य’ हे कटुसत्य अखेरीस उरते.

सारांश काय तर ‘पाण्यात राहून/हिमनगासारखं/तुझ्या आठवणींच्या गराडय़ात/अलिप्तपणे जगता आलं पाहिजे’ हा अनुभव दैती ताण निर्माण करतो, याशिवाय दुसरा कोणता अन्वय लावणार? काव्यनिर्मितीचा प्रत्येक क्षण केवळ प्रार्थनेशी इमान राखतो, असे नाही तर एका अर्थाने तो प्रार्थनावादही मान्य करतो. अनुभवाचे आकार कोरताना अनुभूतीचा निसर्गजन्य आकारही स्वतःचे करुणामूल्य दाखवून देतो. सुखदुःखांच्या सारांशसिद्धीची ही मानसिक प्रक्रिया कलात्मक अर्थसौंदर्य घेऊनच काव्यरूपाने अवतरल्याची या संग्रहात प्रचीती येते. संस्कारदेह आणि संचितदेह यांच्यातील अतूट नात्याची प्रचीतीसुद्धा तेवढीच दमदार असल्याचे जाणवते. ‘त्रिवेणी’ हा काव्यप्रकार हाताळताना अधिक परिणामकारक परंतु मोजक्या शब्दांत एक विचार मांडला आहे, तो तर अधिक विचार पलिलूत आहे. ‘मानाने मिरवत राही, दुःखांचे भरजरी अस्तर! ही सय अशी दरवळते, काळीजच होते अत्तर।।’ अशी दुःखांतून सुखांची सुगंधी आठवण वाचकांस केवळ व्याकुळच करते असे नाही तर आनंदही देते!

नयन बारहातेकृत मुखपृष्ठ आकर्षक आणि समर्पक.

निमित्तमात्र
लेखक – गीतेश शिंदे
प्रकाशन – संवेदना प्रकाशन
पृष्ठ – 104, मूल्य – 130 रुपये