
>> श्रद्धा गुजराथी
डॉ. सुधीर देवरे सरांचं याआधी ‘पंख गळून गेले तरी!’ हे पुस्तक वाचलं होतं. यातील कथन मुळातून हलवून सोडणारं होतं. लेखकाने घेतलेली गरुडझेप स्तिमित करून गेली. जीवनातील संकटाच्या पायऱया कशा चढाव्या आणि पावलोपावली प्रेम कसं देता-घेता येतं याचं अप्रत्यक्ष मार्गदर्शन या पुस्तकातून मिळालं.
आताच देवरे सरांचं ‘सहज उडत राहिलो!’ हे पुस्तक हाती आलं. वाचून होताच अंतर्मनातून उत्स्फूर्त शब्द आले, वाह!!! अप्रतिम…
‘पंख गळून गेले तरी… सहज उडत राहिलो!’ असं परिपूर्ण शीर्षक दोन्ही आत्मकथने मिळून तयार होतं ते यथार्थ ठरतं.
‘सहज उडत राहिलो’ या आत्मकथनात लेखकाच्या आयुष्यात ज्या काही अनाकलनीय-विचित्र घटना घडल्या त्यांच्यावर तर प्रकाश पडतोच, पण लोकसंस्कृती म्हणजे नक्की काय, यावरही वाचकांचे लक्ष वेधून घेणाऱया घटना उपयोजित झालेल्या आहेत. त्यातून वाचकांना लोकसंस्कृती, लोककलांबद्दल बरीच विशेष माहिती मिळते. पुस्तकातील भाषाशैली एकदम धावती आणि सोपी असल्यामुळे पुस्तक वाचकांना लगेच आपलंसं करून घेतं.
अपंगत्वाचं दुःख वाचून वाचक हादरून जातो. अवघड वाटेने वाटचाल करत लेखकाने आपलं जीवन अप्रतिम बनवलेलं. या पुस्तकातून अनेक दिव्यांग व्यक्ती प्रेरणा घेऊ शकतात. लेखकाने हे पुस्तक लिहून वेगळय़ा अर्थाने समाजसेवाच केली आहे, असं म्हणावं लागेल.
पुस्तकात दुःखाची परिभाषा समजावून सांगितली आहे. काही माणसं केवळ अवयवाने दिव्यांग असतात, तर काही माणसांचं मनच अधू- अपंग असतं. त्यावेळी काय करावं? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. अशी दोन्ही ध्रुवांवरील माणसं इथं भेटतात.
आयुष्यात दुःख, वेदना या प्रत्येकालाच असतात. त्यातून मार्ग काढणंही कठीण असतं. तरीही त्यातून सहीसलामत बाहेर पडणं हे तितकंच गरजेचं असतं. विकृत मनाची माणसं समाजात भरपूर असतात. ते या पुस्तकातील ‘वास्तवाच्या-विस्तवाच्या शिवारात’ या भागात वर्णन केलेल्या ‘हिटलर’ मुद्दय़ात येतं. जगाला कवडीमोल समजणाऱया आणि आपणच खूप शहाणे, चांगले असं दाखविणाऱया व्यक्ती समाजात आपल्याला पावलोपावली भेटत राहतात. आपल्याजवळ असणाऱया चांगल्या गुणांची मोठाईकी व दुसऱयाच्या गुणांची नालायकी करणं हेच त्यांचं काम असतं. आपण आहोत म्हणून हे जग चालतं असं यांचं ठाम मत असतं. पण असे लोक जास्त काळ चालत नाहीत. त्यांना त्यांच्या भयानकतेचा आरसा दाखविणारे लोक भेटतातच. खुद्द हिटलरचं तेच झालं. असंच आहे आणि राहणार, असं सांगणारे लोक आपोआपच धारातीर्थी पडतात. सत्य हे त्रिकाळ राहणार यात काही शंका नाही.
सज्जन माणसाची व्याख्याही पुस्तकात आली आहे. अतिसज्जनपणा या दुनियेत कामाचा नाही, हेसुद्धा खूप छान पद्धतीने सांगितलं आहे.
लहानपणातल्या लेखकाच्या आठवणी मनाला चटका लावून जातात. नैसर्गिक विधीच्या ताणामुळे खाणं टाळणं, नोकरीतल्या समस्या, लग्न व लग्नानंतरच्या विविध चर्चा, टोमणे हा भाग तर अतिशय भयावह आहे. साहित्य लिखानाची सुरुवात, मुंबईचा प्रवास, नामदेव निंबाची कहाणी आदी घटना वाचकाच्या मनाला सैरभैर करून सोडतात.
पुस्तकात अधूनमधून येणाऱया कवितेच्या ओळी खूप भावपूर्ण आहेत. लेखकाच्या बालपणीच्या आठवणी भयानक, रोचक व रंजकही आहेत. लेखकाचा जीवनप्रवास न डगमगता कसा चालू राहिला याचे सुंदर पद्धतीने आशादायी वर्णन आलेले आहे. बालपणाच्या या घटना अप्रत्यक्षपणे काहीतरी सांगून जातात, शिकवून जातात. पुस्तकात पुढे काय प्रसंग असेल? अशी वाचकाला उत्सुकता लागून राहते ती शेवटपर्यंत. म्हणून पुस्तक संपेपर्यंत वाचक पुस्तक हातातून ठेवत नाही. पुस्तकातील व्यक्तिरेखा साक्षात डोळय़ांसमोर उभ्या राहतात अशी पुस्तकाची शैली कमालीची भुरळ घालणारी आहे.
पुस्तकात दोन भाग आणि काही परिशिष्टे आहेत. दुसऱया भागात लोकसंस्कृतीबद्दलचं महत्त्वाचं विवेचन वाचायला मिळतं. इतक्या जवळून आपण आपली भाषा, आपली संस्कृती जगत नाही. पण या पुस्तकातील अत्यंत सुंदर निरीक्षणातील वर्णनाने वाचकांना ती मेजवानीच मिळते. प्रत्येक सण, देव, देवस्थान गावांकडील भाषा, त्यांचं राहणीमान इतकं हुबेहूब आलंय की वाचताना वाटतं, आपण गावातच आहोत आणि आपल्या डोळय़ांसमोर या घटना घडताहेत.
वीरगावच्या आठवणी छान आल्या आहेत. पुस्तकाचा शेवटही खूप अर्थपूर्ण झाला आहे. आपण सर्वजण मनासारखं न जगता, आपली कर्तव्यपूर्ती करत जगत असतो. मनासारखं आपण आपल्या मुलांनाही जगू देत नाही. त्यांच्यावरही आपण आपले संस्कार, ध्येय, शिक्षण लादत असतो. ध्येयहीन, ध्येयशून्य जगून, राबून आपण मरतो. आपल्यामागे असणाऱयांनाही आपण हाच मार्ग शिकवतो. कारण आपल्यापेक्षा आपल्याला दुसऱयाची जास्त पडलेली असते. कोण काय बोलेल, समाज काय म्हणेल, आपल्या संस्कारात ही गोष्ट बसत नाही, असे विचार आपण आयुष्यभर करत असतो.
हे पुस्तक डॉ. सुधीर देवरे यांचं आत्मकथन तर आहेच, पण पुस्तकातून अजून बरंच नवं जीवन शिक्षण मिळतं. जीवनाबद्दलचा राग, जगण्याची धडपड, लोकांच्या मनोदशा यांचा सुरेख संगम या आत्मकथनात आला आहे. हे पुस्तक वाचताना काही ओळी माझ्या ओठांवर आल्या. त्या इथं देण्याचा मोह आवरता येत नाही.
‘जगता जगता…
मरण आले केव्हा….
हे कधी कळले नाही….
आता अर्थ शोधून….
काय फायदा….
मी जीवन जगलेच नाही!…’’
हे अप्रतिम पुस्तक वाचून खूप आनंद झाला. डॉ. सुधीर देवरे सरांच्या लेखन शैलीसमोर मी नतमस्तक आहे. म्हणून चित्रदर्शी लेखनशैलीचं उत्तम जीवनदर्शन म्हणजे हे पुस्तक, असं मी म्हणेन.
‘सहज उडत राहिलो’
लेखक – डॉ. सुधीर रा. देवरे
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठ – 237 मूल्य – 250 रुपये




























































