
>> क्षितिज झारापकर
‘होते कुरूप वेडे’ रंगभूमीवरील अजून एक नवे नाटक. संजय नार्वेकर हे या नाटकाचे आकर्षण आहेच. खेरीज सौंदर्य या संकल्पनेवर ‘मार्मिक भाष्य’ हे नाटक करते.
सौंदर्य म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न जगाच्या सुरुवातीपासूनच माणसाला पडलेला आहे. याने किंवा हिने, त्याच्यात किंवा तिच्यात काय पाहिलं? हे बऱ्याच लोकांना बऱ्याचदा टोचत असतं. याचं उत्तर इंग्रजी भाषेतल्या एका सुभाषितात देण्याचा प्रयत्न केला गेलाय- ‘ब्युटी इज इन द आईज ऑफ द बिहोल्डर’. सुंदरता बघणाऱ्याच्या नजरेत असते, पण या उत्तरात सुंदरतेचं भौतिकवादी प्रमाण गृहीत धरलंय. पुलंनी माणसाच्या आंतरिक सुंदरतेचं महत्त्व पटवणारं एक नाटक लिहिलं ‘सुंदर मी होणार’. विजय तेंडुलकरांनीही या विषयावर ‘अशी पाखरे येती’ हे नाटक लिहिलं. थोडक्यात, सैंदर्य म्हणजे नेमकं काय? हा विषय जगातल्या मोठमोठय़ा विचारवंतांना सदैव खुणावत होता, आहे आणि राहणार. मुळात अनुवांशिक निर्देशांनुसार रूप घेऊन जन्माला येणाऱ्या आपल्यासारख्या मनुष्यप्राण्यांना या दोन्ही नाटकांमधील विचार पटला आणि आवडला. दोन्ही नाटकं अजरामर आहेत. आजही त्यांचे प्रयोग होत असतात. आजच्या पिढीलाही हा प्रश्न भेडसावत आहेच. तिच्यात किंवा त्याच्यात काय आहे, जे माझ्यात नाही? हा कोणत्याही कॉलेजात कोणत्याही काळी असंख्य वेळा ऐकू येणारा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या मुळाशी ‘आपल्यात काय आहे’ हेच आपल्याला उमगलेलं नाही हा कळीचा मुद्दा आहे. पुलंच्या आणि तेंडुलकरांच्या नाटकांचा मुद्दाही हाच होता. राजेश देशपांडे या आजच्या पिढीतल्या अग्रगण्य लेखक-दिग्दर्शकाने आजच्या पिढीला त्यांच्या कोष्टकातून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नाचं रंगमंचीय रूप आहे ‘होते कुरूप वेडे’ हे नवीन मराठी नाटक.
‘होते कुरूप वेडे’ हे नाटक राजेश देशपांडे सध्याचे अग्रगण्य लेखक-दिग्दर्शक का आहेत याचंही उत्तर आपल्याला देतं. कारण ‘होते कुरूप वेडे’मध्ये ते आपल्याला डायरेक्ट गिरीश कर्नाड यांच्या ‘हयवदन’चा रेफरन्स देऊन या सौंदर्याच्या प्रश्नाला एक खूपच इंटरेस्टिंग फाटा फोडतात. या वेगळ्या दृष्टिकोनामुळे ‘होते कुरूप वेडे’ अचानक खूप वेगवान आणि मनोरंजक बनतं. राजेश देशपांडे हे व्यावसायिक रंगकर्मी आहेत आणि त्यांनी ‘होते कुरूप वेडे’ हे अत्यंत व्यावसायिक पातळीवर विचार करून बेतलेलं नाटक आहे. बुद्धी, स्वभाव आणि रूप या गोष्टी एकाच्या ठायी मिळणं दुर्मिळ. हा गाभा घेऊन ‘होते कुरूप वेडे’ दोन वेगळ्या व्यक्तिरेखांना एकमेकांसमोर ठाकतं आणि सुरू होतो एक अनाकलनीय गोंधळ. या गोंधळातून सावरण्याची कसरत म्हणजे राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक. ‘होते कुरूप वेडे’ हे जसं जबरदस्त मनोरंजन करून प्रेक्षकाभिमुख ठेवण्यात आलंय, तसंच हे नाटक कलाकारांनाही सांभाळणारं आहे. यातील सर्व कलाकारांना व्यवस्थित वाव मिळेल याची देशपांडय़ांनी लेखनात खबरदारी घेतलेली आहे. दिग्दर्शनातही त्यांनी सर्व पात्रांना अत्यंत हुशारीने वापरून ‘होते कुरूप वेडे’ वेगवान आणि मजेदार केलं आहे. नाटक पाहताना प्रेक्षकांना उसंत न देण्याचं कसब राजेशने येथे वापरलंय. पहिला अंक सुरू होताच आपण नाटकात घुसतो आणि प्रयोग संपून घरी पोहोचेपर्यंत तरी किमान नाटक आपल्या सोबत असतं हा नाटकाचा विजय आहे.
या नाटकाचे कलाकारदेखील भव्य आहेत. संजय नार्वेकर यांचं हे पंचविसावं व्यावसायिक नाटक आहे. इथे संजय नार्वेकर आपल्या नेहमीच्या दमछाक करणाऱ्या अभिनय शैलीपेक्षाही थोडा पुढे जाऊन सादर होतात. ते एकाच वेळी हळवे भावुक कुटुंबवत्सल होतात आणि लगेच पातळयंत्री षडयंत्र रचणारेदेखील होतात. संजय नार्वेकर हे दोन्ही करू शकतात. म्हणूनच ते मराठीतले सिल्व्हर ज्युबिली स्टार आहेत. त्यांच्याच बाजूला नयन जाधव या हरहुन्नरी कलाकाराने या दोन छटा तितक्याच उठावदारपणे सादर केल्या आहेत. हे नाटक या दोन अभिनेत्यांची शोकेस म्हणता येईल. संजय नार्वेकरांनी नाटकाची ही गरज हेरून नयनचा स्कोप आणि स्पेस त्याला देऊन केलेला ‘होते कुरूप वेडे’मधला अभिनय लाजवाब आहे. नयन जाधवनेही संजय नार्वेकरांसमोर आपला बाणा उभा करण्यात कोणताही आडपडदा ठेवलेला नाही. या दोघांमुळे हे नाटक अधिक परिणामकारक होते, पण या दोन व्यक्तिरेखांना जोडणारी घरातल्या बायकोची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. येथे शलाका पवार चपखल बसतात. दोन ऑथरबॅक्ड व्यक्तिरेखा समोर असताना आपण आपलं पात्र ठसवणं सोपं नाही. शलाकाने ‘होते कुरूप वेडे’ हे साध्य केलंय. किंबहुना, नाटक पुढे सरकतं ते तिच्यामुळेच. हे नाटक संजय नार्वेकर, नयन जाधव आणि शलाका पवार या तीन स्तंभांवर उभं आहे. याव्यतिरिक्त भरत सावले यांचा भावुक गुंड, मीनाक्षी जोशी, कल्पेश बाविस्कर आणि नितीन जाधव या सगळ्यांचं टायमिंगचं कसब कमाल आहे. कोणताही कलाकार बारीक बारीक जागाही सोडत नाही. या चौघांचं वैशिष्टय़ हे की, हे चौघे सतत रिऍक्ट करत असतात. विनोदी नाटकात विनोद करणाऱ्याइतकाच त्यावर रिऍक्ट होणारा महत्त्वाचा असतो हे या चौघांना कळलेलं आहे आणि तेच या नाटकाचं शक्तिस्थान आहे. एकत्रितपणे प्रयोग रंगतो तो या चौघांच्या सांघिक कामगिरीमुळे.
संदेश बेंद्रे यांनी पुन्हा एकदा कल्पक नेपथ्य करून ‘होते कुरूप वेडे’ अधोरेखित करण्यात मदत केली आहे. आमीर हडकरने संगीत उत्तम देऊन रंगत वाढवली आहे. मंगल केंकरे यांनी पूरक वेशभूषेने पात्र जिवंत करण्यात मदत केली आहे. अभय मोहिते यांनी रंगभूषा नीटनेटकी सांभाळलेली आहे. एकंदरीतच दादासाहेब पोते यांनी या सर्व रंगकर्मींवर निर्माते म्हणून टाकलेला विश्वास सर्वांनी सार्थ ठरवलेला आहे. डी.एस.पी. एन्टरटेन्मेन्टस् प्रा.लि.चं ‘होते कुरूप वेडे’ हे नाटक खरोखर एक हुरूप आणणारं नाटक आहे.
- नाटक : होते कुरूप वेडे
- निर्मिर्ती : डी.एस.पी. एन्टरटेन्मेंट्स प्रा.लि.
- निर्माते : दादासाहेब पोते
- कार्यकारी निर्माते : मंगेश नगरे
- नेपथ्य : संदेश बेंद्रे
- संगीत : आमीर हडकर
- प्रकाश : शीतल तळपदे
- वेशभूषा : मंगल केंकरे
- रंगभूषा : अभय मोहिते
- लेखक, दिग्दर्शक : राजेश देशपांडे
- कलाकार : शलाका पवार, मिनाक्षी जोशी, कल्पेश बावीस्कर,भरत सावले, नितीन जाधव, नयन जाधव आणि संजय नार्वेकर
- दर्जा : ***



























































