बाबा : नात्यांच्या (अति) नाटय़ाने ओथंबलेला सिनेमा

2198

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही त्रुटी असतात, काही खंत असते, कोणी काही आयुष्यात चुका केल्या असतात आणि तरीही आपण आपले आयुष्य जगत असतो. पुढे आयुष्याला नवा आकार द्यायचा प्रयत्न करत असतो. पण कधीतरी जुन्या जखमा पुन्हा एकदा जिवंत होतात आणि त्यांनतर अनेक आयुष्य ढवळून निघतात. आयुष्याच्या अशाच एका अत्यंत हळव्या, मातृत्वाच्या कप्प्याची गोष्ट म्हणजे ‘बाबा’ हा सिनेमा.

या सिनेमाचा विषय भुरळ पडावा इतका छान आहे. यातली हळवी गोष्ट ऐकताक्षणी कोणाच्याही डोळ्यात पाणी उभे करेल. पण आधीच इतका संवेदनशील, हळवा विषय असताना त्यात अति नाटय़मयता घालण्याचा मोह जर दिग्दर्शकाला आवरला नाही तर त्या सिनेमाचं सत्त्व पुसलं जाऊ शकतं. तसचं काहीसं ‘बाबा’ या सिनेमाचं झालं आहे.

कोकणातल्या गावात राहणाऱया एका त्रिकोणी कुटुंबापासून ही गोष्ट सुरू होते. आई, वडील आणि त्यांचा मुलगा गरीब असूनही आनंदात राहात असतात, पण त्यांच्यात एक त्रुटी असते. तिघेही जण मूकबधिर असतात. काही कारणामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलाला वयाच्या आठव्या वर्षांपासून समाजापासून दूर ठेवलेलं असतं, पण जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा इतरांच्या संपर्कात येतो तेव्हा त्याला ऐकू येत असल्याचा उलगडा होतो शिवाय त्याला वाचा असून कधी संवादांच्या संपर्कात ते न आल्यामुळे तो मुका झाला असल्याचं लक्षात येतं. आणि अशातच या कुटुंबामध्ये एक नवं वादळ येतं. या वादळाला तोंड देताना त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं, सगळे पर्याय नष्ट होतात… असं नेमकं काय असतं हे वादळ? हे कुटुंब त्याला सामोरं का जातात? नेमकं काय कारण असतं की मुलाला अनेक वर्षे समाजापासून वंचित ठेवण्यात आलं असतं? अशा अनेक प्रश्नांना उलगडत हा सिनेमा पुढे सरकतो आणि एक हळवी कथा आपल्याला पाहायला मिळते.

शंकर या छोटय़ा मुलाने कमाल अभिनय केला आहे. निरागस, मूकबधिरांच्या सहवासात राहून आलेलं मुकेपण या गोष्टी खूप उत्तमरीत्या साकारल्या आहेत. नंदिता पाटकर, दीपक दोब्रियाल, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर या सगळ्यांची कामे आपापल्या ठिकाणी नेटकी आहेत. छायांकन, दृश्यांची बांधणी, पार्श्वसंगीत या बाबीदेखील तशा जमून आल्या आहेत.

फक्त गडबड वाटते ती सिनेमाच्या मांडणीत. हा सिनेमा लिहिताना त्याच्या कथेच्या इतक्या प्रेमात पडलं गेलंय की त्या प्रवाहात अनेक मुख्य धागे निसटून गेले आहेत हे लक्षातही आलं नाही. म्हणजे मुलगा मूकबधिर नाही हे वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत आई-वडिलांना लक्षातच आलं नाही? किंवा त्यांचा जगाशी इतका संपर्क नाही की ही बाब कधी कोणाच्या लक्षातच आली नाही. बरं कोणतेही आई, बाबा जेव्हा आपल्या मुलावर अतोनात प्रेम करतात तेव्हा ते त्याचं शिक्षण, विकास यावर लक्ष देतात, पण जगापासून लपवून ठेवण्याच्या नादात हे आई, वडील आठ वर्षांपर्यंत त्याचं शिक्षणच होऊ देत नाहीत हे खूपच विचित्र वाटतं. अशा अनेक बाबी आहेत ज्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं.

इमोशनल करण्याच्या नादात सिनेमा उगाच वाहवत गेलाय असं राहून राहून वाटतं. या सिनेमाचं नाव ‘बाबा’ आहे म्हणून बाबा ही व्यक्तिरेखा साकारणारे दीपक दोब्रियल आणि आर्यन मेंघजी या बाल कलाकार या दोघांवरच खूप जास्त मेहनत घेतली आहे. या दोघांच्या व्यक्तिरेखा छान साकारल्या आहेत. त्यात इतरांच्याही व्यक्तिरेखा तशाच उभ्या केल्या असत्या तर समतोल साधता आला असता. किंबहुना मुलाच्या आईची भूमिकादेखील थोडी दुय्यमच राहिली आहे.

कोर्टात घडलेलं दृश्य किंवा लहानग्या सोबतची काही नाटय़मय दृश्य बरी झाली आहेत, पण सिनेमाला प्रवाहीपणा मात्र नाही. विषय ठरवून घडवल्यासारखा वाटतो. मध्यांतराच्या आधी सिनेमा पकड घेत नाही आणि मध्यांतरात तो कसं वळण घेणार अगदी शेवटाकडे काय घडणार हे स्पष्ट दिसतं आणि तसचं घडतं. एक ओळ कथेच्या प्रेमात पडून त्याला जास्त विचार न करता फार वेगळे फाटे न देता घडवला गेल्यासारखा हा सिनेमा आहे.

अर्थात हा सिनेमा एकदा बघायला डोळ्यातून पाणी येण्यासाठी म्हणून चांगला आहे, पण त्यातल्या त्रुटी आणि जरा जास्तच असलेली नाटय़मयता अधून मधून खटकेल. ती दुर्लक्षित करता आली तर सिनेमा तसा करमणूक नक्की करेल.

सिनेमा – बाबा
दर्जा – अडीच स्टार
निर्माता – मान्यता दत्त, अशोक सुभेदार
दिग्दर्शक – राज आर गुप्ता
लेखक – मनीष सिंग
कलाकार – आर्यन मेंगजी, दीपक दोब्रीयल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, तेजस देवस्कर.

आपली प्रतिक्रिया द्या