
>> क्षितिज झारापकर
‘इन्शाअल्लाह’… पं. सत्यदेक दुबेंच्या मूळ हिंदी नाटकाचा‘आकिष्कार’ने मराठीत उत्कृष्ट अनुकाद साधला आहे.
नाटक हा समाजमनाचा आरसा असतो असं म्हणतात. निदान अशा आलंकरिक भाषेत नाट्यक्षेत्राविषयी बोललं की संबंधितांना बरं वाटतं. पण खरंच असं असतं का? आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न नाटक म्हणजे नक्की काय? तर माझ्यापुरती नाटकाची व्याख्या मी अशी करतो की, नाटक हे एक व्यासपीठ आहे ज्यावरून एक लेखक कोणत्याही विषय, विचार, घटना आणि भावनेबद्दलचं त्याचं मत दिग्दर्शकाच्या मदतीने आणि नटांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवू शकतो. थोडक्यात नाटककाराच्या विचारांचं भांडवल करून अभिनयाच्या माध्यमातून सादर होणारी कलाकृती म्हणजे नाटक. हुशार नाटककार आणि दिग्दर्शक मग आपल्याच विचारांना समाजमनाचा लिबास चढवून विकतात. नाटक चाललं की पहा समाजाला हे पटलं असं म्हणून मोकळे होतात. खरंतर नाटक चालण्याची कारणं अनेक असू शकतात. फक्त नाटकातला विचार पटला म्हणून ते चाललं हे म्हणणं चुकीचं ठरेल. हे झालं व्यावसायिक रंगभूमीचं. प्रायोगिक स्तरावर मात्र रंगकर्मी स्वतःचं म्हणणं स्वतःचं म्हणूनच मांडताना दिसतात. इथे मुळात नाटकं चालण्याची वानवा. म्हणूनच आपले विचार परखडपणे आणि बऱ्याचदा प्रामाणिकपणे मांडण्याचं धाडस रंगकर्मी करतात. या दुसऱ्या प्रकारात मोडणारी एक संस्था आहे ‘आविष्कार’. गेली कित्येक वर्षे आविष्कार अशी प्रामाणिक प्रायोगिक नाटकं करत आलीये. मुळात नाटक म्हणजे समाजमनाचा आरसा नक्की आहे का? या प्रश्नाने सुरू होणारं एक नाटक आविष्कार सध्या सादर करतंय. नाटकाचं नाव आहे ‘इन्शाअल्लाह’.
‘इन्शाअल्लाह’ हे सत्यदेव दुबे लिखित हिंदी नाटक. आविष्कारचे चेतन दातार या अत्यंत प्रतिभावान रंगकर्मीने काळाच्या पडद्याआड जाण्याआधी त्याचा मराठी अनुवाद केला. नाटक सर्वेश्वर नावाच्या एका नाट्यदिग्दर्शकाचं कथानक आहे. पण त्याहीपेक्षा ‘इन्शाअल्लाह’ हे सत्यदेव दुबेंचं स्वैर आत्मकथन आहे. सत्यदेव दुबे हे प्रायोगिक नाट्यवर्तुळातलं आदरणीय व्यक्तिमत्त्व. आपल्या आयुष्याल्या बऱ्या-वाईट आठवणींना त्यांनी ‘इन्शाअल्लाह’मध्ये प्रामाणिकपणे वाचा फोडली आहे. नाटकाचं क्राफ्टिंग त्यांनी खास त्यांच्या शैलीत केलंय. पात्रांची, माणसांची, भावनांची आणि घटनांची गुंतागुंत इतक्या शिताफीने केली आहे की प्रेक्षक म्हणून आपण त्यात गुरफटले जातो आणि अगदी नकळतपणे नाटकातल्या पात्रांबरोबर फिरू लागतो. बहुतेकवेळा अनुवादात मूळ गाभा हरवण्याची शक्यता असते. चेतनने मात्र ‘इन्शाअल्लाह’चा अनुवाद इतका बेमालूम केलेला आहे की, हे अनुवादित नाटक आहे असं भासतच नाही. पं. सत्यदेव दुबे आणि चेतन दातार या दोघांना इथे अभिवादन करणे गरजेचे आहे. इतक्या नामवंत माणसाचं आत्मकथनपर नाटक उभं करणं ही एक अत्यंत रिस्की बाब आहे.
अजित भगत हे आविष्कारचे सध्याचे रेसिडेन्ट दिग्दर्शक. त्यांनी ‘इन्शाअल्लाह’ तितकंच जिवंत वाटेल आणि सरकत राहील याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. भगतांचं ‘इन्शाअल्लाह’चं दिग्दर्शन हे पूर्णपणे प्रायोगिक नाहीये. नाटकातला सगळा मेलोड्रामा ते जाणीवपूर्वक सेन्टर स्टेजवर मांडतात आणि अधिक परिणामकारक करतात. प्रायोगिकतेच्या नावाखाली उगीच अंडरप्ले करणंही त्यांनी टाळलं आहे. ‘इन्शाअल्लाह’च्या कलाकारांनी नाटकात कमाल केलेली आहे. सर्वप्रथम गौतम बेर्डेचा देवेन्द्र खन्ना हा खन्ना वाटतो. बेर्डेंचा एकंदर वावर, त्यांची शरीरयष्टी या सगळ्याचा खूप सुंदर वापर केला गेलाय. मृणाल वरणकरची गुलन खूपच खरी आणि स्वाभाविक झाली आहे. मृणालने तालमीतली मानसी करतानाचा अवखळपणा आणि त्याच धाटणीची खरी गुलन करतानाचा किंचितसा पोक्तपणा या बारीक बारीक छटा उत्तम वठवल्या आहेत. मोनलिसा विश्वास शबनम अत्यंत सहजतेने उभी करते. सुदेश बारशिंगे यांचा इंडस्ट्रीयलिस्ट अभिजीत रसिक असून कोरडा वाटतो, पण यात गंमत आहे. त्याची पत्नी कुंदा साकारताना संजाना हिंदूपूर आवश्यक तेवढी लाघवी आणि चंचल दिसून येते. धनेश्वर सिंग, सचिन पाटील, प्राप्ती बने, किरण मोरे आणि संतोष पाटील यांनी आपापली कामगिरी चोख केलेली आहे.
‘इन्शाअल्लाह’ची गंमत आहे ती सर्वेश्वरच्या भूमिकेत गुणवंत कलाकार सुशील इनामदार याला पाहण्यात. सुशीलने या भूमिकेत मूर्तिमंत दुबे उभे केलेत. त्यांचा रागीट स्वभाव, समोरच्याची अवहेलना करणं वगैरे गोष्टी तर सर्वज्ञात आहेत. एका गुणी कलाकाराला ते उभं करणं सोपं आहे. पण सुशीलने खाजगीतले इन्सिक्योअर दुबे, भेदरलेले दुबे आणि याचक अवस्थेतले दुबे जसे साकारलेत त्याला सलाम. ‘इन्शाअल्लाह’ सुखकर करण्यात हा सिंहाचा वाटा ठरतो. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे नाटक अत्यंत प्रामणिक आहे. कलाकार ते प्रामाणिकपणे सादर करतात. अजित भगत यांनी ते अत्यंत प्रामाणिकपणे रचलंय. चेतन दातार याने ते प्रामाणिकपणे रूपांतरीत केलंय आणि मुख्य म्हणजे दुबेजींनी अत्यंत प्रामाणिकपणे लिहिलंय. बऱ्याचदा आत्मकथनपर लिखाण हे हातचं राखून केलं जातं. इथे तसं नाहीये. ‘इन्शाअल्लाह’मधले संबंध, भावना, पात्र सगळं काही अत्यंत प्रामाणिकपणे मांडलं गेलंय. इतकं की स्वतः सरंजामशाहीच्या जमीनदार घराण्यातून आलेल्या दुबेजींची डावी विचारसरणीही ‘इन्शाअल्लाह’मध्ये एक मार्क्सिस्ट दृष्टिकोन घेऊन डोकावून जातो. सोळा आणे जगण्यातले आठ आणे स्वतःसाठी आणि आठ आणे समाजासाठी ही फिलॉसॉफी अत्यंत प्रामाणिकपणे मांडत असताना आज माझ्या हातात माझे असे चार आणे उरलेत हे ते सहजपणे सांगून जातात.
आविष्कार संस्थेने स्वतःची हक्काची जागा नसतानाही अशी दर्जेदार नाटकं देत राहणं हे खरंच कौतुकास्पद आहे. वयाच्या 89व्या वर्षी अरुण काकडे काकांचा उत्साह पाहून मराठी रंगकर्मींची उमेद नक्कीच वाढते. मी खरं तर नाटकांमध्ये व्यावसायिक, प्रायोगिक असा भेद मानत नाही. नाटक चांगलं किंवा वाईट असतं. ‘इन्शाअल्लाह’ हे एक चांगलं नाटक आहे.
- नाटक : इन्शाअल्लाह
- निर्मिती : आविष्कार
- लेखक : पं. सत्यदेव दुबे
- अनुवाद : चेतन दातार
- निर्माते व सूत्रधार : अरुण काकडे
- दिग्दर्शक : अजित भगत
- नेपथ्य : प्रकाश-रवी-रसिक
संगीत : चिन्मय-निनाद - नृत्य दिग्दर्शन : दीपाली विचारे
- कलाकार : मोनालिसा विश्वास, संजना हिंदूपूर, मृणाल वरणकर, प्राप्ती बने, गौतम बेर्डे, धनेश्वर सिंह, सचिन पाटील, सुदेश बारसिंगे, किरण मोरे, संतोष पाटील, संकल्प सूर्यवंशी, सुशील इनामदार
- दर्जा : ***



























































